मुंबई – अत्यंत दाट लोकवस्ती, अस्वच्छता, सार्वजनिक सौचालयांचा वापर अशी कोरोना संक्रमणाच्या वाढीसाठी पोषक परिस्थिती असताना देखील धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने धारावी मॉडेलचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. मात्र आजचा दिवस धारावीकरांसाठी चिंतेचा ठरला असून येथे गेल्या चार आठवड्यातील सर्वाधिक रुग्ण आज सापडले आहेत.
आज धारावीमध्ये २३ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. याबाबत बोलताना बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, महिन्याभरापासून धारावीमध्ये एका दिवसात २०पेक्षा अधिक रुग्ण सापडले नव्हते मात्र आज प्रथमच २० पेक्षा अधिक रुग्ण सापडले अशी माहिती दिली.
आज वाढलेल्या २३ कोरोना रुग्णांमुळे धारावीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २४१५ एवढी झाली असून यातील २०६७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे. या आकडेवारीनुसार धारावीतील केवळ ९९ कोरोना रुग्ण ऍक्टिव्ह असल्याचं स्पष्ट होतंय.
धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून येथे कोरोनाचा पहिला रुग्ण १ एप्रिलरोजी सापडला होता. यानंतर साडेसहा लाख लोकवस्ती असलेल्या अडीच स्क्वेअर किलोमीटर भूभागावर वसलेल्या धारावीत ‘चेस द व्हायरस’ मोहीम राबवण्यात आली होती.
घरोघरी जाऊन कोरोना लक्षणांबाबत चाचपणी करण्यात आल्याने येथील बाधितांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून खाली येत असल्याचं दिसत होत. धारावीसारख्या परिसरात प्रशासनाने उत्तम कामगिरी करून कोरोनाग्रस्तांची संख्या खाली आणल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कौतुक करण्यात आले होते.
दरम्यान, आज धारावीत २३ रुग्ण सापडल्याने काहीशी चिंता निर्माण झाली आहे. यासोबतच आज दादर परिसरात ५९ तर माहीम परिसरात १७ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.