पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 28,500 इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक तरुणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आलेल्या आकडीवरून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत 10731 तरुणांना करोनाची बाधा झाली आहे. एकूण रुग्णांपैकी तरुणांचे प्रमाण हे 40 टक्के आहे.
शहरात करोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज सरासरी एक हजार रुग्णांची नोंद होत आहे. शहरात रविवारी दुपारपर्यंत 28,500 रुग्णांची नोंद करण्यात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक तरूणांचा समावेश आहे. आतापर्यंत 10731 तरूणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये 22 ते 39 वर्षीय तरूणांचा समावेश आहे. तर त्याखालोखाल 40 ते 59 वर्षीय 8026 प्रौढ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्षांपेक्षा जास्त) लागण होण्याचे प्रमाण आहे. आतापर्यंत 3169 ज्येष्ठ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. 13 ते 21 वर्षे वय असलेल्या किशोरवयीन 2581 मुलांना लागण झाली आहे. तर 12 वर्ष व त्यापेक्षा लहान असलेल्या 2463 चिमुकल्यांना लागण झाली आहे. उपचाराधीन असलेल्या रुग्णांपैकी 4448 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. तर 798 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहे. उर्वरित 111 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 52 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.