भोरची सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची

शरद पवार आणि अनंतराव थोपटे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर

जिल्हा प्रतिनिधी

पुणे- विधानसभा निवडणूक प्रचार अखेरच्या टप्यात असताना जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. अनेक दिग्गजांच्या भाषणांची राळ उडताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच कारणातून अशा सभांकडे मतदारांचे लक्ष लागलेले असताना भोरमध्ये शनिवारी (दि.19) होणाऱ्या सभेकडे जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे. येथे होणाऱ्या या सभेला दोन साहेब आणि दोन दादा.., उपस्थित राहणार असल्याने भोर मधील ही सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
राज्यात होणारी विधानसभा निवडणूक “आघाडी’ करून लढण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेपुढे मोठे आव्हान निर्माण करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील मतदार संघ पिंजून काढलेले असताना भोर विधानसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ पवार यांची शनिवारी (दि.19) कापूरहोळ येथे सभा होत आहे. ही सभा सध्या वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे.

भोर तालुक्‍यातील कापूरहोळ येथे होणाऱ्या आघाडीच्या या सभेसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थितीत राहत असताना माजी मंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचीही या सभेला उपस्थिती असणार आहे. बारामतीचे “साहेब’ अशी शरद पवार यांची ओळख आहे तर भोरमध्ये अनंतराव थोपटे यांना “साहेब’ मानले जाते. याशिवाय या सभेला दादा म्हणून परिचीत असलेले अजित पवार आणि भोरमध्ये दादा म्हणून ओळख असलेले आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे हे सर्वजण एकाच व्यासपीठावर असतील.

कापूरहोळ येथे शनिवारी होणाऱ्या सभेसाठी शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे दोन्ही दिग्गज नेते उपस्थित राहत असले तरी पवार आणि थोपटे यांच्यातील राजकीय मतभेद बाजूला पडून राजकारणातील मैत्रीचे हे पर्व समोर येत आहे. कॉंग्रेसमध्ये असताना या दोन्ही नेत्यांची असलेली दाट मैत्री राज्याच्या राजकारणाने अनुभवली आहे. मात्र, कॉंग्रेमधून मधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर या आपल्या सहकाऱ्यांसमवेत दि. 10 जून 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती, त्यानंतर ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली होती.

याच कारणातून 1999 हे वर्ष राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. कारण, कॉंग्रेसमधून पवार बाहेर पडल्यानंतर दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात त्याचे अधिक पडसाद उमटणार होते आणि याच कारणातून कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी पवार यांच्या सोबत न जाता कॉंग्रेस पक्षातच राहणे पसंत केले. त्यातील एक नाव होते ते म्हणजे अनंतराव थोपटे आणि याच कारणातून या दोन्ही नेत्यांची नावे घेतल्याशिवाय दोन्ही कॉंग्रेसचे राजकारण पूर्ण होत नाही. आता, राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेता आता पुन्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी भाजप-शिवसेने समोर उभी ठाकली आहे. यातूनच 2014 मध्ये एकाच व्यासपीठावर असलेले पवार आणि थोपटे पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. याच कारणातून कापूरहोळ येथे शनिवारी होणारी सभा महत्त्वाची ठरणारी आहे.

लोकसभेसाठी मतदारांनी वाजपेयी यांच्या पारड्यात दान टाकले असताना विधानसभेसाठी मात्र राज्यातील मतदारांनी युतीला कौल दिला नाही. त्यावेळी दि. 6 ऑक्‍टोबरला निकाल आला तो राजकारणाला आणखी एक कलाटणी देणारा ठरला होता. शिवसेना आणि भाजपचे पिछेहाट होताना कॉंग्रेसने 75 जागा मिळविल्या होत्या; राज्यभरात झंझावातील प्रचार करणारे अनंतराव थोपटे यांचा तो करिष्मा ठरला होता तर इकडे पहिलीच निवडणूक लढवणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 58 आमदार निवडून आले होते. यातूनच आघाडी होत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले होते.

  • …त्यातून आघाडीचे सरकार आले
    लोकसभा निवडणुकीसोबतच सप्टेंबर 1999 मध्ये दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी शिवसेना-भाजपाने ही निवडणूक एकत्र येत लढविली होती तर पाहिल्यांदाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकां विरोधात लढले होते. 1999 या निवडणुकीने मतदार आणि त्यातही राज्यातील मतदार, कसा सजग आहे, हे दाखवून दिले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.