युतीच्या मनोमिलनाचा पाडव्याचाही मुहूर्त टळला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील युतीचा तिढा गुडीपाढव्याचा आणि भाजपाच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून सोडविला जाणार असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र युतीमधील तिढा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही सुटला नसून दोन्ही पक्षातील त्रांगडे अद्यापही कायम आहे. भाजपाचे पदाधिकारी आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काय भूमिका घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघाचा मावळमध्ये तर एका मतदारसंघाचा शिरुर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरात कधीही सलोख्याचे वातावरण नव्हते. त्यातच 2014 मध्ये युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातून विस्तवही जात नाही, अशी परिस्थिती होती. महापालिकेवर भाजपाची सत्ता, शहरात दोन भाजपाचे आमदार तर लोकसभेला दोन शिवसेनेचे खासदार अशी परिस्थिती शहरात होती. दोन्ही पक्षाची युती तुटल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या कारभाराचे वाभाडे दोन्ही खासदारांनी काढले होते.

भ्रष्टाचारी कारभारावर दोन्ही खासदारांनी जोराची टीका केली होती. त्यातच मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात वर्षानुवर्षाचे राजकीय हाडवैर आहे. शिवसेनेत बारणे तर भाजपात जगताप आहेत. आता सेना – भाजपाने वरिष्ठ पातळीवरून युती केल्यामुळे दोन्ही नेते एकत्र येणार हा खरा मुद्दा होता. सुरुवातीला राज्य आणि देशपातळीवर या दोन्ही पक्षांची युती झाल्यामुळे शहरातही झाले-गेले विसरून सर्वजण एकत्र येतील, असे वाटत असतानाच दोन्ही पक्षातील वितुष्ट अधिकच ताणले गेले.

भोसरीपुरता मर्यादित विषय आमदार महेश लांडगे यांनी संपुष्टात आणत आढळराव यांचे काम सुरू केले आहे. मात्र मावळ मतदारसंघातील वाद कायम आहे. या मतदारसंघात चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हा वाद संपुष्टात यावा म्हणून बरेच प्रयत्न केले मात्र त्याला यश आले नाही. जगताप यांनी आपली भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले. यानंतर राज्यपातळीवरील नेत्यांनीही प्रयत्न केले मात्र त्यांनाही यश आले नाही.

हा वाद गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर संपुष्टात येईल आणि सर्व काही सुरळीत होईल, असे दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते, ते ही आता फेल ठरले आहे. मनोमिलन मेळावेही दोन्ही पक्षांना एकत्र आणू शकले नाहीत. भाजपा आणि शिवसेनेतील हा वाद कायम असल्याने भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे. आता मुख्यमंत्री या वादावर कधी तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गिरीश महाजनांच्या अपयशाची चर्चा
भाजपातील दिग्गज नेते म्हणून ज्या गिरीश महाजनांना ओळखले जाते त्या महाजनांनी पिंपरी-चिंचवड शहरातील लक्ष्मण जगताप यांच्या घरी जावून या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. भाजपाचे चाणक्‍य समजल्या जाणाऱ्या महाजनांना शहरातील वाद मिटविण्यात आलेले अपयश हा सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.