मुंबई – राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेला दोन आठवड्यांचा कालावधी होऊनही अद्याप मंत्रिमंडळ रचना झालेली नाही. आता त्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ रचनेसाठी राष्ट्रपती निवडणुकीनंतरचा नवा मुहूर्त देण्यात आला आहे. ती निवडणूक 18 जुलैला होणार आहे.
नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनला पदांची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ रचना रखडल्याने राज्य मंत्रिमंडळात सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्या रूपाने दोनच सदस्य आहेत.
राज्यातील सत्ताबदलाचे नाट्य सध्या न्यायप्रक्रियेत अडकले आहे. त्यावर 11 जुलैला सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ रचनेसाठी पाऊले उचलली जातील, असे संकेत मिळत होते. सत्ताधाऱ्यांच्या गोटातून आषाढी एकादशीनंतरचा मुहूर्त सांगितला जात होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी प्रलंबित राहिल्याने आता सत्ताधाऱ्यांच्या गोटातून नवा मुहूर्त पुढे करण्यात आला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रपती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ रचना होण्याचे संकेत दिले. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची महत्वाची बैठक 13 जुलैला दिल्लीत होणार आहे. त्या बैठकीत शिंदे गटाचा प्रतिनिधी सहभागी होईल. त्यानंतर एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू 14 जुलैला मुंबईत येणार आहेत.
फ्रीझमध्ये हे पदार्थ ठेवणे टाळा; कोविडबाबत आणखी एक संशोधन…
राष्ट्रपती निवडणुकीची तयारी 16 आणि 17 जुलैला होईल. त्यानंतर 18 जुलैला मतदान होईल. त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आमदार व्यस्त असतील. त्यामुळे मंत्रिपदांची शपथ घेण्यासाठी कुणाकडे वेळ असेल? कुणालाही कुठली घाई नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे अजून किमान आठवडाभर तरी मंत्रिमंडळाची रचना होणार नसल्याचे सूचित झाले.
गुजरातमध्ये पुन्हा आढळला कोट्यवधींचा अंमली पदार्थ साठा, मुंद्रा बंदरावर तब्बल…