भोर येथील प्रचारसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचा विश्वास
भोर – भोर-वेल्हे-मुळशीची भूमी ही छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी आहे. भोर-वेल्हे आणि पुरंदर शिरूरमुळे आज मुंबई जिवंत आहे. महाराष्ट्राची राजधानी उभी करण्यामागे या तालुक्यांमधील लोकांची शक्तीच महत्त्वाची आहे. पैसा कमावण्यासाठी येथील लोक मुंबईला जातात, पण मतदान करण्यासाठी न चुकता गावालाच येतात. या वेळीही ते विधानसभेत 93 टक्के उपस्थिती देऊन 984 प्रश्न तारांकित करणारा आणि 50 लक्षवेधी सूचना मांडून आपल्या मतदारसंघात 553 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणणारे कर्तबगार आमदार संग्राम थोपटे यांना विधानसभेत तिसऱ्यांदा पाठवून हॅट्ट्रिक करतील, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
भोर विधानसभेचे महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचाराची सभा भोर येथील सह्याद्री मंगल कार्यालयाच्या सभागृहात झाली. यावेळी उपस्थित सुमारे 25 हजार मतदारांना संबोधित करताना खासदार सुळे बोलत होत्या.
यावेळी भोर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, उपसभापती श्रीधर किंद्रे, मुळशी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष महादेव कोंढरे, भोर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे समन्वयक सुनील चांदेरे, नगराध्यक्षा निर्मला आवारे, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, मुळशी तालुका कॉंग्रेसच्या अध्यक्षा गितांजली शेटे, गीता आंबवले, भोर शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा हसिना शेख, उपनगराध्यक्ष गणेश पवार, गटनेते सचिन हर्णसकर, रवींद्र बांदल, संदीप नांगरे, ज्ञानोबा धामुणसे, अरूण मालुसरे, पर्वती कुमकर आदि मान्यवरांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले की, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते शरद पवार यांनी ग्रामीण भागाची होत असलेली दुर्दशा सावरण्यासाठी आघाडीचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मने जुळवण्यात यामुळे यश आले. मागील पंचवार्षिकमध्ये विकासकामात प्रांतिक भेदभाव न करता मुळशी तालुक्याला झुकते माप दिले आहे. येत्या शनिवारी (दि. 19) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची कापूरहोळ-हरिश्चंद्री येथे जाहीर प्रचार सभा होणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांचा तिरंगा जम्बो हार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी मांडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. उमेश देशमुख यांनी केले, तर शैलेश सोनवणे यांनी आभार मानले.
या विधानसभेच्या निवडणुुकीत 203 चे 302 करायला निघालेले उमेदवार विधानसभेचा आमदार होण्याचे दिवास्वप्न पाहात आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांना
प्रचारसभेसाठी निमंत्रित करताच त्यांनी माझा शब्द उचलून धरला व आज भोरमध्ये तीन सभांना उपस्थिती दाखवून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतभेद दूर केले आहेत. आता प्रचाराला खरा वेग येणार असून विजयाची खात्री झाली आहे.
– संग्राम थोपटे, आमदार, भोर विधानसभा