कोलकाता – देशभरातील अनेक शहरांमध्ये करोना लसीचे डोस पोहोचविण्यात आले असून आजपासून करोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि करोना योद्ध्यांनाच लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र लसीकरणासाठी आता राजकीय पुढारी आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे.
देशातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्याचे ठरले आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने नियम धाब्यावर बसवून लस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्व वर्धमान जिल्ह्यातील भाटार विधानसभा मतदार संघातून हे आमदार आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या केवळ एकाच आमदाराने लस घेतली नसून कटवा विधानसभा मतदार संघाचे आमदार रबी चॅटर्जी यांनी देखील कोरोना लस घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक पाहता केंद्राने जारी केलेल्या नियमानुसार पहिल्या टप्प्यात देशातील एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि कोविड काळात जीवाची बाजी लावणाऱ्या दोन कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील वय असलेल्यांना लस देण्यात येणार आहे. मात्र आमदार राजकीय वजन वापरून लस घेत असल्याचे समोर येत आहे.