इंदापूरच्या पाणी प्रश्‍नावर आमदार कडाडले

बुडीत बंधारे उभारणी प्रस्तावाचे जलसंपदा मंत्र्यांनी दिले आदेश

रेडा – उजनी धरणामध्ये शंभर टक्‍के पाणी असताना देखील इंदापूर तालुक्‍यातील धरण क्षेत्रातील गावांना पिण्याचे व वापरण्याचे पाणी मिळत नाही. तसेच, पाणलोट परिसरातही वाळवंटा सारखी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत उजनी बॅकवॉटर परिसरातील भागात बुडीत बंधारे निर्माण करून पाणी समस्या काही प्रमाणात निकाली काढावी, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आमदार दत्तात्रय भरणे यांनी निदर्शनास आणून देताच जलसंपदा मंत्र्यांनी याबाबतचे आदेश काढले आहे.

उजनी धरणाच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात विधान भवनात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत आमदार भरणे यांचा झंझावात दिसून आला. नद्यांवर बुडीत बंधारे बांधण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे, असे आवाहनही भरणे यांनी यावेळी केले. याची दखल थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेत बुडीत बंधारे बांधण्यासाठी शासनाकडे त्वरित प्रस्ताव सादर करा असे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे व मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, पुणे तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांची विशेष बैठक मुंबई येथे विधान भवन येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मंत्री सुभाष देशमुख, विजय देशमुख व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आमदार दत्तात्रय भरणे आमदार भारत भालके, आमदार राहुल कुल, प्रणिती शिंदे, नारायण पाटील तसेच जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव राजेंद्र पवार, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, कार्यकारी संचालक मोहम्मद अंसारी, मुख्य अभियंता विलास राजपूत, अधीक्षक अभियंता धीरज साळी, कार्यकारी अभियंता धनंजय कोंडेकर यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंत्री महोदयांच्या खास बाब म्हणून अनेक गोष्टी लक्षात आणून दिल्या. यामध्ये उजनी धरण शंभर टक्के भरले असताना देखील बॅकवॉटर परिसरातील भिगवन परिसरापर्यंत पाणी कसे मिळत नाही, धरण परिसरात पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर चर खोदण्याची वेळ शेतकऱ्यांवर कशासाठी, असे सवाल आमदार भरणे यांनी केले. नीरा नदी भागातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्यासाठी केटीवेअर बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात यावी, अशा अनेक विषयांववर आमदार भरणे यांनी या बैठकीत इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची बाजू मांडली, अखेर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित विभागाला बुडीत बंधारे बांधण्यासाठी तात्काळ प्रस्ताव द्या, असा आदेशच या बैठकीत काढला, त्यामुळे बुडीत बंधारे निर्माण होणार असल्याने इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची पाण्याची कायम समस्या निकाली निघण्याची अशा निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.