अंतरीक्षातील उपग्रहावर क्षेपणास्त्र हल्ला यशस्वी

देशाने मोठी क्षमता प्राप्त केल्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली – भारताने आज अंतरीक्षातील उपग्रहावर क्षेपणास्त्र हल्ला करून तो नष्ट करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून त्यामुळे भारताच्या अंतरीक्ष क्षमतेत मोठी वाढ झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. पंतप्रधानांनी आज दुपारी अत्यंत नाट्यपुर्ण वातावरणात ही घोषणा केली. त्यावर देशातून संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.
आज पावणेबारा ते बाराच्या दरम्यान मी महत्वाची घोषणा करणार आहे त्याकडे लक्ष ठेवा अशी सुचना खुद्द पंतप्रधानांनीच आपल्या ट्‌विटर हॅंडलवर केली होती. त्यामुळे देशभर मोठीच उत्सुकता निर्माण झाली होती.

सकाळी पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी लगेच ही सुचना जारी केल्याने साऱ्या देशाचे लक्ष ते काय घोषणा करणार याकडे लागले होते. नोटबंदी सारखा महत्वाचा निर्णयही त्यांनी असाच अचानक घोषीत केला होता. त्यामुळे ऐन निवडणूक काळात आणि आचारसंहिता लागू असताना ते काय निर्णय घेणार या विषयी नाट्यपुर्ण तणाव निर्माण झालेला पहायला मिळाला होता. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना याही वेळी टीव्ही वरील घोषणा होईपर्यंत बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती तसेच त्यांच्याकडील मोबाईल फोनही काढून घेण्यात आल्याच्या बातमीने तर उत्सुकता कमालीची ताणली गेली.

त्यांनी केलेल्या घोषणेनुसार भारताने अंतरीक्षात तीनशे किमी उंचीवर असलेला उपग्रह क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करून पाडण्यात आला. मिशन शक्ती नावाने हा उपक्रम राबवण्यात आला. भारताने स्वदेश बनावटीने हे तंत्रज्ञान विकसीत केले असून जगातील काही मोजक्‍याच देशांकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यात आता भारताचा समावेश झाला असून भारताची अंतरीक्ष शक्ती आता वाढली आहे. भविष्यात अंतरीक्ष तंत्रज्ञान आणि त्याच्या कौशल्याला खूप महत्व येणार आहे असे ते म्हणाले. त्यादृष्टीने भारताने मिळवलेले हे यश लक्षणीय असल्याचे मोदींनी सांगितले. भारताला ही शक्ती आता प्राप्त झाली असली तरी त्याचा कोणत्याही देशाविरूद्ध गैरवापर केला जाणार नाही असे त्यांनी नमूद केले. हा आमच्या क्षमता सिद्धीचा उपक्रम आहे त्यामुळे या चाचणीचा कोणत्याही देशाच्या विरोधात वापर होणार नाही किंवा कोणाला इशारा देण्यासाठीही ही चाचणी करण्यात आलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.