मंचर -लोणी (ता. आंबेगाव) येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित मुलीच्या आईने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार लोणी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 23) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही बाथरूमला जाऊन येते, असे सांगून घरातून बाहेर गेली होती. त्यानंतर ती बराच वेळ होऊनही घरात परत आली नाही. त्यामुळे तिचा घराच्या परिसरासह गावात आजूबाजूला तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींकडे शोध घेतला; परंतु ती कोठेही सापडली नाही.
तिला अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असावे, असे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास साबळे करीत आहेत.