पुणे – अल्पवयीन मुलीने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन बाल विवाहाविरुद्ध आवाज उठवला आहे. याप्रकरणी तिच्या आईने तक्रार दिल्यावर नवरदेवासह त्याच्या घरच्यांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा बाल विवाह प्रतिबंध कायद्यानुसार दाखल झाला आहे.
याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. संबंधित महिला लोणीकाळभोर येथील पाषाणकर बागेजवळ रहाते. तिच्या तक्रारीनुसार बेबी गंगाराम मिरेकर, गोविंद गंगाराम मिरेकर , सुनीता गोविंद मिरेकर (रा. पाषाणकर बाग, लोणीकाळभोर ता.हवेली ), गंगाराम हनुमंता डांगरे, गंगाराम डांगरे, निला डांगरे( रा. गुलबर्गा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित 15 वर्षीय मुलीचा विवाह दि. 16 जून 2020 रोजी कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाला होता.
विवाहानंतर ती माहेरी आली होती. यानंतर तिने सासरी जाण्यास नकार दिला आणि थेट लोणी काळभोर पोलीस स्टेशन गाठले. तेथे प्रथम तिची दखल घेतली गेली नाही. यानंतर तिने एका “एनजीओ’ला फोन केला. त्यांनी इतर बालहक्क संघटनांशी संपर्क साधला.
यानंतर पोलीस ठाण्यात तिच्या आईने तक्रार दाखल केली. संबंधित मुलीचा विवाह इतर नातेवाईक व ओळखीच्या आरोपींनी गंगाराम हनुमंता डांगरे (35) याच्याशी लावून दिला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी सूरज बंडगर करत आहेत.