दौंडला मंत्रिपदाचे गाजर मात्र, तिप्पट मताधिक्‍क्‍याची “मेख’

आमदार कुल यांच्यापुढे खडतर आव्हान : “कमळ’ की “कपबशी’ निवडणार याकडे लक्ष

– मानसिंग रुपनवार

केडगाव – आगामी काळात आमदार राहुल कुल यांना मोठी जबाबदारी देणार, असे सूतोवाच करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्‍याला मंत्रीपद देण्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले; परंतु त्यासाठी आमदार कुल यांना मागील निवडणुकीत मिळालेल्या विजयी मतांच्या तिप्पट मतांची आघाडी मिळाली पाहिजे, अशी “मेख’ मारायला मात्र, ते विसरले नाहीत. त्यामुळे आधीच रासप की भाजप कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याच्या तळ्यात-मळ्यात असलेल्या आमदार कुलांवर मुख्यमंत्र्यांनी तिप्पट मताधिक्‍याचा “बॉम्ब’ टाकल्याने कुल “कपबशी’ की “कमळ’ यापैकी कोणच्या चिन्ह निवडता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दौंड मतदारसंघातील सध्याची स्थिती पाहता तिप्पट मताधिक्‍य मिळणे कठीण असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा शनिवारी (दि. 15) दौंड तालुक्‍यात आली होती त्यावेळी वरवंड बाजार तळावर पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील वक्‍तव्य केले, मात्र, तिप्पट मताधिक्‍याचे “पाचर’ मारल्याने आमदार कुल यांच्यापुढचे आव्हान खडतर झाले आहे. दरम्यान, महाजनादेश यात्रेतील वरंवड येथील सभेची आमदार गटाने मोठी तयारी केली होती गावागावात फलक आणि ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सभेला उपस्थित राहण्याची नागरिकांना आवाहन करण्यात आले होते, तर मुख्यमंत्री काय बोलतात यासाठी नागरिकांनीही सभेला मोठी गर्दी केली होती. गर्दीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांना भविष्यात मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे सांगितले; परंतु तिप्पट मतांच्या फरकाने निवडून देण्यात यावे, अशी अट घालून दौंडच्यल मंत्रीपदाचा “चेंडू’ पुन्हा जनतेच्या “कोर्टात’ टोलावला आहे.

2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार रमेश थोरात यांच्यात “काट्याची टक्‍कर’ झाली होती, त्यामध्ये राहुल कुल केवळ 11 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र आमदार कुल यांच्यापेक्षा राष्ट्रवादीने तालुक्‍यात मोठे यश संपादन केले होते, शिवाय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही आमदार कुल यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना तालुक्‍यातून जेमतेम सात हजारांची आघाडी मिळाली आहे, त्यामुळे कुलांबाबत तालुक्‍यात नाराजीचा सूर पसरला असल्याचा नागरिकांसह राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे.

…अन्यथा आमदारकी जाण्याची शक्‍यता
सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असणारे राहुल कुल हे भारतीय जनता पक्षाच्या जास्त संपर्कात आहेत त्यामुळे ते कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतात हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. तसेच जर “कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवली तर तिप्पट मताधिक्‍य मिळवण्यासाठी आमदार कुल यांना थोडा कमी घाम गाळावा लागेल. रासपच्या चिन्हावर लढल्यास आमदारकीही हातची जाऊ शकते, असा राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज असल्याने आमदार कुल यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीला थोरातांशिवाय पर्याय नाही
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात इच्छुकांची संख्या आजमितीला अधिक असली तरी माजी आमदार रमेश थोरात यांच्याइतका तगडा उमेदवार त्यांच्याकडे दुसरा नाही. राष्ट्रवादीची अवस्था राज्यभर नाजूक असल्याने दौंडची उमेदवारी थोरात सोडून दुसऱ्याला देणे राष्ट्रवादीला सध्या परवडणारे नाही, त्यामुळे कुल-थोरात असाच सामना होईल असा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय इतर पक्षाचे उमेदवार, अपक्ष अशी संख्या विचारात घेतली तर जास्त मतांची आघाडी मिळवण्यासाठी कुल यांना नियोजनबद्ध प्रचारावर भर द्यावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.