बारामती/जळोची – राज्यातील दुधाचे दर महाविकास आघाडी सरकारच्या काळात नीचांकी झाले होते. आमच्या सरकारच्या काळात 39 रुपयांपर्यंत दर गेले होते. सध्या दुधाचे दर कमी होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. यात राज्य सरकार योग्य निर्णय निश्चित घेईल, अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दरम्यान, त्यांनी याप्रश्नी लवकरच राज्यातील सर्व सहकारी व खासगी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावणार असल्याचे सांगितले.
बारामतीत ते माध्यमांशी ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, ते म्हणाले की, अमूलसारखी संस्था आज चाळीस रुपये लिटर दुधाला भाव देऊ शकत असेल तर सहकारी संस्था असा दर का देऊ शकत नाही. वाढलेल्या खर्चाचा सर्व भार उत्पादकांनी उचलायचा हे योग्य नाही.
याबाबत आता काहीतरी निर्णय करावा लागेल. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींची भूमिका देखील जाणून घेतली जाईल. पशुखाद्याच्या दराबाबत सरकारला यात हस्तक्षेप करावा लागेल.