नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने भारतीय लष्कराच्या विरोधात “मायक्रोवेव्ह वेपन’ वापरल्याचे वृत्त लष्कराने फेटाळले आहे. या आशयाचे वृत्त ब्रिटनस्थित एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. मात्र भारतीय लष्कराने तातडीने ट्विट करून हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि खोटे असल्याचे स्पष्टिकरण दिले आहे.
चिनी सैन्याने दोन उंचावरच्या ठिकाणांवरून भारतीय जवानांना मागे सरकण्यास भाग पाडले. तसेच या भागांवर भारतीय लष्कराला पुन्हा ताबाही घेऊ दिला. कोणत्याही पारंपारिक संघर्षाशिवाय हा ताबा हस्तांतरित करण्यात आला. थोडक्यात या भागांना चिनी सैन्याने “‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ प्रमाणे रुपांतरित केले, असा दावा या वृत्तामध्ये केला गेला होता.
बिजींगमधील रेनमीन विद्यापिठातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक जीन कानरोंग यांनी केलेल्या दाव्यावर हे वृत्त आधारलेले होते. पूर्व लडाखमध्ये ऑगस्टच्या अखेरीच्या काळातच शस्त्रे तैनात केली गेली होती.
या काळात पॅनगोंग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील खोऱ्याच्या बाजूची आणि चुशूल भागतील बहुतांश ठिकाणाची उंचावरची ठिकाणे भारतीय लष्कराने ताब्यात घेतली होती. मात्र 15 मिनिटांनंतर भारतीय सैनिकांना तेथे थांबणेही शक्य झाले नाही.
त्यामुळे त्यांना पळ काढावा लागला, असे या प्राध्यापक महाशयांनी एका व्याख्यानात म्हटले होते. त्याचा आधार घेऊन ब्रिटनमधील एक दैनिकाने “मायक्रोवेव्ह ओव्हन’ संदर्भातील दावा केला होता.
चीनने यापूर्वी 2014 मध्ये सर्वप्रथम मायक्रोवेव्ह वेपनचा वापर केला होता. “पॉली डब्लू बी-1′ या प्रात्यक्षिकांदरम्यान या उपकरणाचे प्रात्यक्षिक केले गेले होते.
चीनव्यतिरिक्त अमेरिकेनेही ऍक्टिव्ह डिनायल सिस्टीम नावाने असेचा उप्करण विकसित केले आहे. ते अफगाणिस्तानमध्ये तैनात केले गेले होते. मात्र तेथे माणसांवर वापर करण्यपूर्वीच तेथून मागे घेतले गेले होते.
मायक्रोवेव्ह वेपन म्हणजे काय ?
मायक्रोवेव्ह वेपन हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेपन असतात आणि त्याचा उपयोग मायक्रोवेव्ह ओव्हनप्रमणेच केला जातो. या उपकरणाच्या आधारे त्वचेखालील पाण्याच्या सूक्ष्म कणांचे तापमान वाढवले जाते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढून तीव्र वेदना होतात. या वेदना टाळण्यासाठी त्या ठिकाणावरून दूर निघून जाणे हाच पर्याय शिल्लक राहिलेला असतो.
ही प्रक्रिया म्हणजे स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या मायक्रोवेव्ह ओव्हनप्रमानेच असते. एखाद्या ठिकाणी झालेली अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि 0.6 मैल दूरपर्यंत त्याचा प्रभाव असू शकतो.