पुणे – पुणे मेट्रोच्या धान्य गोदाम ते रामवाडी या मार्गाचे कामही वेगाने सुरू असून या मार्गावर मेट्रोचा पहिला स्पॅन मंगळवारी रात्री यशस्वीपणे बसविण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील कामाला गती मिळणार आहे.
महामेट्रोकडून डिसेंबर 2019 मध्ये वनाज ते धान्य गोदाम या मार्गात वनाज ते गरवारे महाविद्यालय हा 5 किलोमीट्रचा प्राधान्य मार्ग सुरू केला आहे. हे काम प्रगतीपथावर असतानाच, धान्य गोदाम ते रामवाडी या मार्गाचे काम हाती घेतले आहे. त्यात आरटीओ कार्यालय ते बंडगार्डन पर्यंतच्या खांबांचे पायाचे काम पूर्ण झाले असून बंडगार्डन परिसरात खांबांचे काम पूर्ण झाले आहे. या पूर्ण झालेल्या खांबांवर स्पॅन बसविण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. त्यासाठी गर्डर लॉंचिंग मशीन बसविण्यात आली असून या मशीनद्वारे पूर्ण झालेल्या खांबांवर स्पॅनचे काम केले जाणार आहे.
याशिवाय, याच मार्गावर राजा बहादूर मील रस्त्यावर दुसरे गर्डर लॉंचिंग मशीन बसविण्यात येत असल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले. त्यामुळे नगररस्त्यावरही महामेट्रोच्या कामाने वेग पकडला असून हे काम नजरेस दिसू लागले आहे.