खालापूर : रायगड जिल्हा हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु अलीकडील काळात रायगडामधील शेतीला औद्योगिक वसाहतींचे ग्रहण लागल्याने भातशेती कमी होत चालली आहे. शेतीचे क्षेत्र कमी होत असल्याने उरले सुरले शेतकरी देखील पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी यांत्रिकी पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळेच पारंपारिक शेतीचा आधार असलेली बैल, गायी-म्हशी ही जनावरे दावणीला दिसत नसून जनावरांची संख्या घटत चालली आहे. पारंपरिक शेती जसजशी आधुनिकतेकडे झुकत आहे, तशाच काही जुण्या परंपरा देखील नाहीशा होत आहेत. यापैकी एक म्हणजे भात कापणी आणि झोडपणीनंतर पेंढा साठविण्यासाठी उभारले जाणारे माच कमी झालेले दिसतात.
दहा पंधरा वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यात इतक्या प्रमाणात औद्योगिक वसाहत नव्हती. त्यामुळे लोकांकडे शेतीशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. गावच्या गावे ही शेतीत राबतानाचे चित्र दिसायचे. तसेच शेतीला जोड धंदा म्हणून बहुतांश शेतकरी जनावरांचा संभाळ करीत होते. जनावरांची संख्याही अधिक असायची. त्यामुळे जनावरांना वर्षभर चारा मिळावा यासाठी शेतकरी पेंढा साठवून ठेवायचे. यासाठी ते खास शेतात माच (उंचावरील जागा) बनवून त्यावर पेंढा रचून ठेवत असत.
जनावरांना वर्षभर चांगली वैरण चारा मिळावा यासाठी शेतकरी आपल्या शेतातील भाताचा पेंढा माच तयार करून त्यावर साठवून ठेवत. सध्या मात्र परिसरात वाढलेली औद्योगिक वसाहत, कमी झालेले शेतीचे क्षेत्र, तसेच जनावरांची घटलेली संख्या यामुळे गावोगावी सहजरित्या दिसणाऱ्या माच दिसेनाशा झाल्या आहेत.
शेती व जनावरांच्या सेवेतच आमचं संपूर्ण आयुष्य गेलं. मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. मुलं शाळा शिकल्याने त्यांना शेतात काम करण्याची लाज वाटू लागलीये. जनावरे तर त्यांना नकोशीच झालीत. आमच्याकडे आधी पन्नास ते साठ जनावरे असायची, त्यातील बैल हे शेतातील कामासाठी उपयोगी पडायचे. भात लावणी सुरू झाली की गुरे बांधून ठेवायचो, मग त्यांना जागेवरच दिवसभर पेंढा घालायचो. हा पेंढा आम्ही भात झोडणी झाली की उंच माच करून त्यावर ठेवायचो. माचीवर पेंढा ठेवण्याची दोन कारणे होती, एक म्हणजे कुणी त्याचा नास करू नये. दुसरे म्हणजे त्याखाली सावली भेटायची. दुपारी ही जनावरे याच माचांचा आधार घेत. आता ना कुठे तशा माच दिसतात, ना तितक्या तेवढा पेंढा आहे.
– लहु वाघमारे, शेतकरी, परखंदे आदिवासी वाडी