सातारा -लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचे “स्टडी फ्रॉम होम’ सुरू असतानाच कुटुंबातील सदस्य पारंपरिक खेळांबरोबर नवनवीन खेळही मुलांसोबत खेळताना दिसत आहेत. खेळ खेळतानाही मुलांच्या मनात करोनविषयी जागृती करण्याची संकल्पना जागी होत आहे. त्यामुळेच रुचिता क्षीरसागर या पाच वर्षीय चिमुकलीने कृत्रिम घर बनविण्याच्या खेळातून “स्टे ऍट होम’चा संदेश दिला असून तिच्या या संदेशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लहान मुलांमध्ये करोना विषाणूबाबत जनजागृती व्हावी, मुलांनी घरातच थांबून आपल्या व कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे.
बारामतीच्या अनंत इंग्लिश स्कूलमध्ये छोट्या गटात शिकणाऱ्या रुचिताने आपल्या वडीलांकडे हट्ट धरून दोन महिन्यांपूर्वी खेळातील घर बनविण्याचे साहित्य विकत घेतले. तंबूवजा घर बनविण्याचा आपला हट्ट सरावाने पूर्ण केला. “घर बन गया मेरा’ असे लडिवाळपणे ती घरातील व शेजारील लोकांना आनंदाने सांगायची. दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्या, परिवारातील चर्चा आणि लोकांचे बदलेलेले वागणे पाहून करोना म्हणजे काहीतरी भयंकर असून त्यापासून दूर राहण्यासाठी आपण घरात बंदिस्त झाल्याची जाणीव तिला झाली. त्यातून तिच्या खेळाच्या घरात “करोना’ आला.
व्हिडिओमध्ये रुचिताने आपले तंबूवजा छोटे घर दाखवून त्यात ती प्रवेश करते. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे घरातच थांबण्याचा व घरातच खेळण्याचा संदेश देते. बाहेर करोना असून कोणीही बाहेर पडू नये असाही संदेश इंग्लिशमध्ये ती देताना दिसत आहे. तिचे हावभाव व अभिनय पाहता सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगली पसंती मिळाली आहे. तिची आई ज्योती क्षीरसागर बारामती येथील महिला रुग्णालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांनीच रुचिताचा व्हिडिओ तिच्या नकळत चित्रित केला. थोड्या सरावाने तिने त्यात प्रभुत्व मिळविल्याचे ज्योती क्षीरसागर यांनी सांगितले. रुचिताचे वडील राजेश क्षीरसागर सातारा येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. घरातच समाजशिक्षणाचे बाळकडू मिळत असल्याने तिचा हा व्हिडिओ उठावदार झाला असून याबाबत तिचे अनेकांनी कौतुक केले आहे.
करोनाचा प्रसार संसर्गाने होत असल्याने नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाच्या कामास पाठबळ देण्याची गरज आहे. शाळांना सुट्टी असल्याने मुले साहजिकच खेळण्यासाठी बाहेर पडू शकतात. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने व्हर्च्युअल क्लासरुम या संकल्पनेतून ऍपद्वारे मुलांचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमात भर घालत रुचिताने “स्टे ऍट होम’चा संदेश व्हिडिओतून देऊन जनजागृती केली असून लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांनी घरात बसूनच वेगवेगळे शालेय, जनजागृतीपर उपक्रम राबवणे गरजेचे आहे.
– राजेश क्षीरसागर (माध्यमिक शिक्षणाधिकारी, सातारा)