शिवकालीन युद्धकलेतून आत्मनिर्भरतेचा संदेश : अनिल शिदोरे

कोथरूड येथे युवक-युवतींसाठी प्रशिक्षण शिबिर

कोथरूड – शिवकालीन युद्धकलेद्वारे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला होता. परंतू, काळाच्या ओघात हे मर्दानी खेळ, युद्धकला नाहीशा होऊ लागल्या होत्या. मात्र, मनसे पदाधिकाऱ्यांनी हे मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धकला शिकण्याची संधी उपलब्ध करून महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे मत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी व्यक्त केले.

कोथरूड मतदारसंघातील तरुण-तरुणींसाठी शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण मोफत शिबिराचे आयोजन जीत मैदान येथे करण्यात आले. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर, पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे, सिनेअभिनेते रमेश परदेशी, राज्य उपाध्यक्ष रणजित शिरोळे, संयोजक ऍड. किशोर शिंदे, संजय काळे, गणेश शिंदे, ऍड. अरुण लंबूगोळ, विभाग अध्यक्ष सुरेखा होले यांसह पदाधिकारी व तरूण-तरूणी उपस्थित होते.

अभिनेते रमेश परदेशी म्हणाले, “जगाला ज्या शिवकालीन युद्धकलेने लढायला शिकवलं, ही युद्धकला काळाच्या ओघात आपण विसरत आहोत. सध्या तरुणाई मोबाइल गेम, वेब सिरीज यात अडकून बसली आहे. त्यांना मैदानावर घेऊन येण्याची जबाबदारी आपली आहे.

उपस्थितांचे आभार सुप्रिया संजय काळे व स्नेहल गणेश शिंदे यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.