“अतिक्रमण हटाव’चा फक्‍त दिखाऊपणा

पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात पुन्हा वाढला अतिक्रमणांचा जोर

सातारा  – शहरात अतिक्रमण न झालेला एकही रस्ता सापडणार नाही तसेच विना परवाना अनेक इमारती उभ्या राहिल्या असल्याचेही पालिकेच्या अतिक्रमण आणि शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांना चांगले ज्ञात आहे. मात्र हे अतिक्रमणधारक शहरातील बडे धेंडे असल्याने त्यांच्यावर कारवाई केल्यास थेट बोलावणे होईल, त्यापेक्षा रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांवर तात्पुरती कारवाई करुन दिखावूपणा केला जात असल्याचा प्रकार सध्या सुरु आहे.

दिवाळीचा मुहूर्त साधून टी अँगलच्या बांधकामांनी राधिका रोड व खण आळीच्या रस्त्यावर जोर पकडला आहे. मात्र अतिक्रमण हटाव पथक विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियेत गुंतल्याने अतिक्रमणांचा जोर पुन्हा वाढला आहे. मंगळवार तळे रस्ता नो हॉकर्स झोन असताना येथे पुन्हा हॉकर्सची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे पालिकेकडून वारंवार होत असलेली नौटंकी कारवाई किती अतिक्रमण हटाव विभागाकडून किती दिवस होणार आहे, अशीच चर्चा सुरु होती.

सातारा शहरात राजवाडा परिसरात फ्रुट मार्केट हे रस्त्यावरच भरले जाते. अनेक इमारतींचे बांधकाम परवाने घेताना वेगळा आराखडा आणि बांधकाम झाल्यावर वेगळाच नकाशा असा प्रकार सध्या सुरु आहे. अनेक ठिकाणी तर विना परवानाच एफएसआय वाढवण्याचे पराक्रम होत असतात.

शहरात रस्त्याकडेला अतिक्रमण दिसणार नाही असे नाही. सर्वच रस्त्याकडेने अतिक्रमणे वाढलेली आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांना एखाद्या ठिकाणी कोणता व्यवासायिक नडला की तेवढ्यापुरता आंदोलनाचा इशारा दिला जातो. मग पालिका तात्पुरती मलमपट्टी करते. बसस्थानक परिसरात अतिक्रमणे वाढल्याबाबत नरेंद्र पाटील यांनी इशारा दिल्याने प्रशासनाला जाग आली होती. मात्र बस स्थानकावरच उभे राहिलेले अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने उभे राहिले हे संपूर्ण साताऱ्याला माहित आहे.

प्रत्येकवेळी या पथकाकडून अलिकडे वरवरची कारवाई होताना दिसते. कुठे रस्त्याकडेच्या छोट्या व्यावसायिकांवर कारवाई होताना दिसते. काढलेली टपरी पुन्हा काही लगेच चार ते पाच दिवसांनी त्याच जागेवर जशीच्या तशी उभी असते. गोल बागेत तब्बल एकतीस टपऱ्या जप्त केलेल्या आहेत. तरी पण रविवार पेठेत नवीन टपऱ्या लागण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)