मिसळ खाता-खाता “दादां’नी जागविल्या “आबां’च्या आठवणी

अन्‌ अजितदादा झाले भावूक

पिंपरी- चटकदार मिसळीच्या लाल भडक तर्रीवर कांदा कोथिंबिरीची पाखरण करीत लुसलुशीत पावाबरोबर घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक घासागणिक दादा काळाच्या पडद्याआड गेलेल्या क्षणांना आठवणींच्या रुपाने पुन्हा जिवंत करत होते…. राजकारणाबरोबरोच वैयक्‍तिक जीवनात एकरुप होऊन गेलेल्या “त्या’ दोघांनी अनेकवेळा मिसळपाव एकत्र खाल्ला होता… आपल्या सहकाऱ्यांनाही तितकाच प्रेमाने खाऊ घातला होता… या मिसळपावाने वैचारिक मतभेद असणाऱ्यांनाही एकत्र आणले होते. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील उर्फ आबा यांच्या मिसळ पावाच्या प्रेमाबद्दल अजित पवार बोलत होते. प्रचारसभेत एरवी करड्या आवाजात विरोधकांचा समाचार घेणारे अजित दादा आज भावूक झाल्याचे पहावयास मिळाले.

निमित्त होते माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी येथील राजमाता कॉलेजमध्ये भरविलेल्या कार्यकर्ता मेळाव्याचे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मंगळवार दि. 16 रोजी भोसरीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर विलास लांडे यांनी अजित पवार यांना नाष्टा करण्याचा आग्रह धरला. यानंतर काही नगरसेवक आणि आमदार विलास लांडे यांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या समोर मिसळ पाव ठेवण्यात आला. उपस्थित इतरांनाही मिसळ पाव देण्यात आला. मिसळ पाव खाण्यास सुरुवात झाल्यानंतर थोड्या वेळातच राजकारणापासून दूर जात अजित पवार यांनी मंत्रालयात मिसळपाव कसा सुरू झाला, याची आठवण सांगण्यास सुरुवात केली.

आम्ही जेव्हा पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झालो त्यावेळी आर.आर. आबाही मंत्री झाले. आबांना मिसळपाव खाण्याचा मोठा छंद होता. आमची पहिलीच कॅबिनेटची बैठक सुरू झाली आणि आबांनी मिसळपावची ऑर्डर केली. आबांनी सांगितलेली मिसळ इतकी चविष्ट होती की त्याची आम्हाला सर्वांनाच गोडी लागली. मंत्रीमंडळात असलेले छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह कॉंग्रेसची मंत्रीही आबांनी सांगितलेली मिसळ आवर्जून खात. आज बऱ्याच दिवसांनी मिसळ खात असल्याने आबांची आठवण झाल्याचे सांगत पवार थोडेसे भावूक झाले. शेजारीच बसलेल्या माजी आमदार विलास लांडे यांनीही आबांच्या आठवणींना उजाळा दिला. नेहमीच आपल्या कडक स्वभावासाठी आणि करड्या आवाजासाठी प्रसिध्द असलेल्या अजित पवारांमधील ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मिसळपावच्या निमित्ताने आबांच्या आठवणींना उजाळा देणारा एक मित्र, सहकारी आणि भावनिक नेताही दिसला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.