अण्णासाहेब मगर यांच्या जयंतीचा पालिकेला विसर

पिंपरी –पिंपरी-चिंचवड शहराचे पहिले नगराध्यक्ष आणि माजी खासदार अण्णासाहेब मगर यांच्या जयंतीचा शुक्रवारी (दि. 26) महापालिकेला विसर पडला. महापालिकेतील त्यांच्या पुतळा परिसराची स्वच्छता केली नाही. तसेच, त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार देखील अपर्ण केला नाही. त्याबद्दल विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने महापुरूषांची जयंती व राष्ट्रीय दिनाबाबत 26 डिसेंबर 2018ला प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामध्ये अण्णासाहेब मगर यांच्या जयंतीचा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांची जयंती साजरी केली नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. अण्णासाहेब मगर यांनी दूरदृष्टी ठेवून नगरपालिका स्थापन केली. त्यानंतर त्याचे महानगरपालिकेत रुपांतर झाले. त्यामुळे शहराचा विकास झपाट्याने झाला.

शहरात विविध उद्योग आले. शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्यांचीच सुवर्ण जयंती महापालिका कशी विसरली, असा सवाल साने यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त चार ते पाच दिवस विविध सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम होणे गरजेचे होते. मात्र, सत्ताधारी भाजपने अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याची स्वच्छता केली नाही की साधा पुष्पहार अर्पण केला नाही. ही बाब अतिशय लाजीरवाणी असल्याचे साने यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ज्यांच्या दूरदृष्टीमुळे शहर विकासाला नवी दिशा मिळाली, त्यांनाच सत्ताधारी भाजप विसरले. त्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस, शहरातील विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने सत्ताधारी भाजप व महापालिका प्रशासनाचा निषेध करीत असल्याचे साने यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे महापालिका इमारतीसमोरील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, साने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अण्णासाहेब मगर यांच्या 25 जून रोजी असलेल्या पुण्यतिथीला महापालिकेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात येते. आजपर्यंत त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम करण्यात आलेला नाही. महापालिकेच्या जयंती व पुण्यतिथीच्या वार्षिक नियोजनात देखील त्याचा समावेश नाही.
– राहुल जाधव, महापौर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.