सभासदांना अक्रियाशील ठरवणारच नाही

कराड – आम्ही सभासदांना अक्रियाशील ठरवणार नाही. घटना दुरुस्तीनुसार आलेल्या आदेशाने सभासदांना नोटीस दिल्या आहेत. याबाबतच्या अटी शिथिल केल्या आहेत. कारखान्यावरील 50 कोटींचे मध्यम मुदतीचे कर्ज वगळता कोणतेही कर्ज नाही. असे सांगून प्रति मेट्रीक टन 50 रुपये मागील ऊसबिलाची तरतूद झाली आहे. ती आम्ही आताही देवू शकतो. परंतु ते बील दिवाळीसाठी ठेवले आहे. त्यामध्ये तीस रुपयांची वाढ करुन एकूण 80 रुपयांचे बील दिवाळीस देण्याची सभेची मंजुरी घेत ते अदा करण्याची ग्वाही कृष्णेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

य. मो. कृष्णा कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले यांना 16 प्रश्नांची जंत्री कारखान्यावर दिली होती. या प्रश्नांची उत्तरे वार्षिक सर्वसाधारण सभेत द्या, अशी मागणी माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी केली होती. त्यावर डॉ. भोसले यांनी समर्पक उत्तरे दिली. येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 63 व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. व्यासपीठावर विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, संचालक गुणवंतराव पाटील, धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, निवासराव थोरात यांच्यासह कराड व वाळवा तालुक्‍यातील आजी-माजी संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, घटना दुरुस्तीनुसार सर्व सहकारी संस्थांमध्ये क्रियाशील व अक्रियाशील हा आदेश आल्याने आम्हीही त्याबाबत नोटीसा दिल्या. एकूण 3 हजार 720 सभासदांना नोटीस दिल्या आहेत. त्यापैकी 397 मयत सभासद आहेत. 1 हजार 621 सभासदांनी गेली बारा वर्षे कारखान्याला ऊस दिलेला नाही. व 1 हजार 443 सभासदांनी दहा वर्षे ऊस घातलेला नाही. प्रश्न विचारणाऱ्यांच्या सत्तेच्या काळापासून ही परिस्थिती आहे. कारखान्याला एक वेळ ऊस घाला याकरिता नोटीस दिल्या आहेत. मागील संचालक मंडळाची 83 कलमान्वये चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 88 कलमान्वये प्रक्रियाही गतीने सुरु आहे. पण हे सर्व समजून घेण्यासाठी आपण कारखान्याच्या प्रोसेडींगमध्ये किती सहभागी आहात.

सभेत केवळ हुल्लडबाजीचे नाटक करायचे. यावेळेस तुमच्याबरोबर तुमचे संचालक तरी आहेत का? कारखान्याच्या हितासाठी तुम्ही कारखान्याच्या कारभारात कधी सहभागी झाला नाही. मग संचालक कशासाठी झाला आहात, असा प्रश्न उपस्थित केला. केवळ कारखान्याच्या सत्तेकडे डोळे लावून बसायचे व मागील पाच वर्षातील कारखाना लूटीचा डाव खेळायचा. याची पुनरावृत्ती होणार नाही. असे सांगून ते म्हणाले, 93 कोटी रुपये 743 बोगस लोकांवर उधळण्यात आले. तुम्ही काळजी करु नका, मोदींच्या राज्यात तुम्हाला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. असेही डॉ. भोसले यावेळी म्हणाले.

30 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची 63 वी सभा सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुरु झाली. त्या दरम्यान कारखाना कार्यस्थळावर माजी चेअरमन अविनाश मोहिते यांची गाडी भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवली. त्यानंतर भोसले व मोहिते गटात वादावादी झाली. याप्रकरणी दोन्ही गटातील सुमारे 30 जणांवर रात्री उशिरापर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

अविनाश मोहिते यांची प्रतिसभा
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी चेअरमन अविनाश मोहिते यांची गाडी रोखल्याने भोसले व मोहिते गटात जोरदार वादावादी झाली. त्यामुळे तेथील वातावरण तंग झाल्याने पोलिसांनी प्रवेशद्वार बंद केले. दोन्ही गटाकडील कार्यकर्ते पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यानंतर अविनाश मोहिते यांनी त्यांच्या घरी प्रतिसभा घेतली. यावेळी मोहिते गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)