“स्थायी समिती अध्यक्षांनी घेतलेली बैठक अनावधानाने’

महापौरांचा खुलासा : धोरणात्मक बैठका घेऊन प्रश्‍न सोडविणार

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात स्थायी समिती अध्यक्षांनी घेतलेली बैठक आणि त्यांनी धोरणात्मक निर्णय हे अनावधानाने घेतले असून यापुढे महापौर या नात्याने मी बैठका घेणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या काही सूचना असतील तर त्या गांभीर्याने घेऊन सोडविल्या जातील, असे मत महापौर राहुल जाधव यांनी “प्रभात’शी बोलताना व्यक्‍त केले.

स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी शनिवारी (दि. 29) रोजी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतले होते. आर्थिक विषयाशी निगडीत बैठका घेण्याचे अधिकार असताना प्रशासकीय विषयासंदर्भातील बैठक घेऊन महापौरांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा प्रकार मडिगेरी यांनी केल्यामुळे पालिका वर्तुळात या विषयाची चांगलीच चर्चा रंगली होती. शनिवारी त्यांनी अधिकार नसतानाही रुग्णांच्या भेटीसाठी येणाऱ्यांना व्हिजिटींग कार्ड देणे, रुग्णांच्या भेटीसाठी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळा निश्‍चित करणे, रुग्णाजवळ पूर्णवेळ राहणाऱ्या नातेवाईकांसाठी ग्रीन कार्ड व रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्हिजिटर्सकरिता पिंक कार्डची व्यवस्था करण्यात यावी, याबाबत आदेश दिले होते.

याबाबत महापौर राहुल जाधव म्हणाले, प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार केवळ महापौरांना आहेत. स्थायी समिती अध्यक्षांसोबतच विषय समिती अध्यक्षांना त्यांच्या समितीच्या कार्यकक्षेसंदर्भात अधिकार आहेत. प्रशासकीय धोरणात्मक बाबी संदर्भात अथवा इतर कोणत्याही सुधारणेबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना करण्याचे अधिकार आहेत. प्रशासकीय सुधारणेसंदर्भात प्रत्येक पदाधिकाऱ्याचे मत ऐकून घेऊन त्यावर कार्यवाही करण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील. तसेच यापुढे मी स्वत: पुढकार घेवून बैठका घेणार आहे. महापौर या नात्याने मी घेणार असून मडिगेरी यांनी घेतलेल्या बैठकांसारखे प्रकार यापुढे होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असे महापौर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.