कोणताही ठोस तोडगा नाही : भुसार बाजारात हमालांचा संप सुरूच
पुणे- तोलणारांना कामावर घ्यावे, यासाठी मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागात हमालांनी पुकारलेल्या बंदाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने घेतलेली मध्यस्थी बैठक निष्पळ ठरली. दि पुना मर्चंट्स चेंबर आणि महाराज्य राज्य, हमाल, मापाडी मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे मागील चार दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप सुरूच राहणार आहे.
बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख, उपसचिव सतीश कोंडे, भुसार विभाग प्रमुख नितीन रासकर
दि पुना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल आणि इतर व्यापारी, महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, सहचिटणीस हनुमंत बहिरट यांच्यासह विविध संघटनांचे पदधिकारी उपस्थित होते. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आहेत. पॅकिंग स्वरूपात माल येतो, तिथे तोलणारांची गरज नसल्याचा डिसेंबर 2014 मध्ये तत्कालीन पणन संचालकांनी काढलेला आदेश कायम आहे. त्यानुसार तोलणारांना काम न देण्याचा निर्णय घेतल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले.
तसेच जिथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा माल येतो. त्या गुळ-भुसार विभागात काम करणाण्यास तोलणारांना काम देण्याची भूमिका चेंबरने घेतली. मात्र, हमाल, मापाडी महामंडळाला ही भूमिका मान्य नाही. बाजारातील काम पूर्ववतपणे सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. याविषयी सहचिटणीस हनुमंत बहिरट म्हणाले, जिथे प्रत्यक्षात शेतकऱ्याचा माल येतो, अशी दुकाने भुसार विभागात अगदी बोटावर मोजण्या इतपत आहेत. तेथे काम केल्यावर एकाही तोलणारा पगार निघणार नाही.
2014 चा आदेश अद्याप लागू झालेला नाही. या प्रश्नावर नेमलेल्या समितीनेही अद्याप निकाल दिलेला नाही. त्यामुळे तोलणारांना काम देणे आवश्यक असल्याची भूमिका घेतली. दोन्ही संघटनांनी आपली बाजू लावून धरली. त्यामुळे या बैठकीत कोणताही निर्णय निघू शकलेला नाही.