सातारा -शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी जादा शंभर जागांची संधी उपलब्ध झाली आहे.
ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांची नुकतीच भेट घेतली होती. आता 12 सप्टेंबर रोजी झालेल्या नीट’ परीक्षेतील गुणवत्तेनुसार सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश दिले जातील. हे महाविद्यालय सुरू झाल्यावर सातारच्या विकासात भर पडेल आणि सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात उदयनराजेंनी म्हटले आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 500 खाटांचे हॉस्पिटल आवश्यक होते. जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय मंजूर करून घेतल्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर जागेचा प्रश्न सोडवण्यात आला.
आरोग्य विभागाकडून जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा स्थायी-अस्थायी आकृतीबंध मंजूर करणे, अधिष्ठाता व अन्य पदांवरील नेमणुका, प्रशासकीय कार्यालय, खावलीऐवजी कृष्णा खोऱ्याची जागेचे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरण, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, राज्याच्या आरोग्य विज्ञान विश्वविद्यालयाची मान्यता, असे टप्पे पार करण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे आणि काही मूलभूत प्रश्न अधांतरी राहिल्याने गतवर्षी प्रवेश प्रक्रिया झाली नाही.
तथापि, 2021-22 ची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, विद्यमान आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रवेश प्रक्रियेस मंजुरी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय, सातारा’ असे महाविद्यालयाचे नाव असेल. हे महाविद्यालय नाशिकच्या महाराष्ट्र हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीशी संलग्न राहील.
12 सप्टेंबरला झालेल्या नीट’ परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार राज्यातील 24 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 100 यांप्रमाणे एकूण 2400 आणि खाजगी महाविद्यालये, डीम्ड युनिव्हर्सिटीमधील 1600 अशा एकूण चार हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार आहेत. येत्या महिन-दीड महिन्यात सातारचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल.
हे महाविद्यालय सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधी, डीन डॉ. संजय गायकवाड, तत्कालीन व विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे योगदान लाभले आहे.