सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असावे : देवेंद्र फडणवीस

यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार सुरु 

मुंबई – सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे. ही भूमिका त्यांनी जबादारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच राष्ट्रीयस्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रीय पत्रकारास यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
मुंबई येथे त्यांच्या हस्ते विविध पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमात 2017 आणि 2018 साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 2016 साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार दै. हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना जाहीर झाला आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी केलेल्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. काही ज्येष्ठ पत्रकारांना धनादेशाचे वितरण करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेचा शुभारंभ केला.

फडणवीस म्हणाले, शासकीय व्यवस्था शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविणे, सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविणे यासोबतच समाजप्रबोधनाच्या कार्यात माध्यमांनी मोठे योगदान दिले आहे. पण आता माध्यमांचा संक्रमण काळ सुरु आहे. मुद्रीत माध्यमांपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आता इलेक्‍ट्रॉनिक आणि डिजीटल माध्यमांपर्यंत झाला आहे.

या संक्रमणावस्थेतही माध्यमांनी आपली मूल्ये कायम जपली पाहीजेत. बातम्यांद्वारे अफवा पसरल्यास त्यातून समाजस्वास्थ्य बिघडते. त्यामुळे अशा संक्रमणाच्या काळात मूल्याधिष्ठीत पत्रकारिता करुन माध्यमांनी विश्वासार्हता जपावी, असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकार हे दबावात काम करता कामा नयेत. पत्रकारांना सामाजिक सुरक्षाही असली पाहिजे. या भावनेतूनच शासनाने निवृत्त पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु केली. आज या योजनेची प्रत्यक्षात सुरुवात करताना मनस्वी आनंद होत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.