शेरखान शेख
शिक्रापूर -सोशल मीडियावर कधीही, कोणताही आणि कसलाही ट्रेंड व्हायरल होऊन लोकप्रिय होतो. सध्या विविध “चॅलेंज हॅशटॅग’ने नेटिजन्सना भुरळ घातली आहे. हे चॅलेंज स्वीकारून विविध छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड करीत असाल तर सावधान व्हा. कारण तुम्ही अपलोड केलेल्या छायाचित्रांचा सायबर गुन्हेगार गैरवापर करू शकतात.
एखाद्याचा संसार, आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकते. सोशल मीडियातील वापराबाबत अधिक सजगता बाळगण्याची गरज आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅलेंजच्या नावाखाली आपला व परिवारासोबत असलेल्या छायाचित्राला सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या ट्रेंडने गेल्या एक दोन वर्षांत अधिकच जोर धरला आहे.
सध्या पती, पत्नी, बहिण भावाच्या, मित्र मैत्रिणींच्या जोडीचे छायाचित्रे व्हायरल होत असून त्याला कपल, सिस्टर, बेस्ट मैत्रीण, फ्रेंड्स, सिंगल तसेच आई, वडील, भाऊ, मुलांचे छायाचित्रे वेगवेगळ्या चॅलेंजच्या माध्यमातून सोशल मीडियावर “व्हायरल’ करण्यासाठी एकच चढाओढ लागली आहे. या विविध चॅलेंजला नेटकऱ्यांकडून पसंतीही मिळत असल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप आदी समाजमाध्यमावर आकर्षक वेशभूषा करून छायाचित्रे अपलोड केले जात आहेत.
सोशल मीडियावर छायाचित्रे अपलोड करते वेळी “हॅश (चॅलेंज चे नाव) चॅलेंज’ असा हॅशटॅग देण्यात येतो. त्यावर सर्च केले की, संबधित चॅलेंज ज्यांनी ज्यांनी स्वीकारले आहे त्या सर्वांचे छायाचित्रे दिसतात. सायबर गुन्हेगार ते छायाचित्रे फोटोशॉपमध्ये एडिट करून हव्या त्या ठिकाणी वापरू शकतात. त्यामुळे बऱ्याचदा तुमच्या चेहऱ्याने तुम्हाला फेक अकाउंटशी सामना करावा लागतो.
एवढंच नाही तर तुमच्या छायाचित्राचा कुठेही, कसाही वापर होऊ शकतो. फेक अकाउंट असेल किंवा केले की, पोर्न साईट्सवरसुद्धा हे छायाचित्रे अनेकवेळा वापरण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. असे अनेकांबाबत सायबर गुन्हे याआधीही घडले आहेत. त्यामुळे “चॅलेंज’ “सोशल’ उपक्रम स्वीकारताना आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत नाही ना याचा एकदा विचार करण्याची गरज आहे.
नागरिकांनी आपले वैयक्तीक छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत तसेच अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट आणि मेसेजचा स्वीकार करू नये. तसेच नागरिकांनी वैयक्तीक छायाचित्राबाबत सावधानता बाळगली पाहिजे.
-औदुंबर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर विभाग, पुणे ग्रामीण