पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात मतदार पुन्हा भाजपचे कमळ फुलवतील, आपल्याला संधी देतील, असा विश्वास भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत संग्राम पक्ष, शिवसंग्राम महायुतीच्या कसबा मतदारसंघाच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केला. टिळक यांनी सोमवारी मतदार संघात पदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी टिळक यांनी सार्वजनिक मंडळांनाही भेटी दिल्या.
यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधत बहुमताने निवडून देण्याची भावनिक साद घातली. सकाळी शिवराम दादा तालीम, गोविंद हलवाई चौक, कस्तुरी चौक, डोके तालीम, व्यापारी मंडळ, पालखी विठोबा चौक परिसरात रॅलीचे अयोजन केले होते.
सायंकाळी सूर्या हॉस्पिटल चौकापासून रॅली सुरू झाली. देवजी बाबा चौक, गावकोस मारुती, माणिक चौक, शिवाजी रोडमार्गे कसबा गणपती मंदिर येथे या प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला.
नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, नगरसेवक योगेश समेळ, भस्मराज तिकोने, अजय तांबट, सैद मेजर, चारू शिंदे, प्रभाग अध्यक्ष संदीप इंगळे, भारतीय जनता पक्षाचे कसबा मतदार संघातील सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.