समिती सदस्य सामूहिक राजीनामे देणार?
पुणे – महापौर चषक क्रीडा स्पर्धांच्या संयोजनावरून पालिकेच्या क्रीडा समिती आणि सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धांमधील कुस्ती, कबड्डी आणि बॉडीबिल्डींगच्या स्पर्धांसह काही मुख्य स्पर्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडा समितीला सूचना न देताच आपल्याकडे ठेवल्या आहेत. त्यामुळे नाराज समिती सदस्यांनी अध्यक्षांसह इतर सदस्यांना स्पर्धांचे संयोजन न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या स्पर्धांना क्रीडा समितीची मान्यता घेण्यासाठी सोमवारी समितीची बैठक बोलावली आहे. यात अंतिम निर्णय होणार आहे.
दरवर्षी महापौर चषक क्रीडा स्पर्धांत 20 हून अधिक प्रकारच्या खेळांचा समावेश असतो. याच्या आयोजनाचे अधिकार महापौर यांना असतात तर त्याचे वेळापत्रक तसेच खर्चास आणि कोणत्या संस्थांना हे आयोजनाचे काम द्यायचे या प्रस्तावास क्रीडा समिती आणि त्यानंतर स्थायी समिती मान्यता देते.
दरवर्षी या स्पर्धांमधील कुस्ती, कबड्डी तसेच बॉडीबिल्डींग या स्पर्धा आपल्या प्रभागात भरविण्यासाठी नगरसेवक आग्रही असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत या स्पर्धा महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते अथवा संबंधित पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकांच्या प्रभागात होतात. तर क्रीडा समिती अध्यक्ष आणि समितीच्या इतर काही सदस्यांच्या प्रभागातही या स्पर्धांचे आयोजन केले जाते.
मात्र, यावर्षी क्रीडा समिती अध्यक्षांसह इतर सदस्यांच्या वाट्याला कोणत्याच स्पर्धा आल्या नाहीत. त्यामुळे भाजपच्याच क्रीडा समिती अध्यक्षांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. क्रीडा समिती अध्यक्ष म्हणून स्पर्धांचे संयोजन आमच्याही प्रभागात व्हावे, अशी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर समितीमधील इतर सदस्यही आक्रमक झाले असून अध्यक्षांकडे समितीच्या सदस्यांची एक औपचारीक बैठकही झाली. यात समिती सदस्यांनी महापौर चषक स्पर्धांचे संयोजन न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.