महापौरांचा अजब दावा… पाणी कपात योग्यच

पिंपरी  – दिवसाआड पाणी कपातीमुळे अर्ध्या शहराला दोन दिवसांतून एकदा पुरेसे पाणी मिळत होते. मात्र, कपात रद्द केल्यानंतर याच पाणी पुरवठ्यातून संपूर्ण शहराला पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असून नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. दररोज पाणी पुरवठ्याचा निर्णय आपल्याच अंगलट आल्याची कबुली महापौर राहुल जाधव यांनी आज (शुक्रवारी) दिली. तर एकदिवसाआड पाणीपुरवठा योग्य असल्याचा अजब दावा त्यांनी केला. विशेष बाब म्हणजे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणावर मात्र त्यांनी गप्प राहण्यातच समाधान मानले.

पवना धरणावर मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची भिस्त आहे. गतवर्षी ऑगस्टमध्येच धरण शंभर टक्के भरले. परंतु, पावसाने लवकरच परतीची वाट धरली. अवेळीच नदीऐवजी धरणातून पाणी उचलण्याची वेळ आल्याने महापालिकेने दिवाळीपासूनच अंशतः पाणी कपात केली. यंदा तीव्र स्वरुपाच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

यंदाही जूनच्या शेवटच्या आठवड्‌यात मॉन्सूनचे आगमन झाले. आठवडा भराच्या तुरळक हजेरीनंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे पाणी कपातीचे संकट गहीरे झाले होते. मात्र, जुलैचा अखेर “मॉन्सून’ने पुन्हा हजेरी लावत “बॅक लॉग’ भरुन काढला. त्यामुळे धरणातून विसर्ग करण्याची वेळ आली.

धरण नव्वद टक्के भरताच पिंपरी-चिंचवडकरांची पाणी कपात मागे घेण्याची मागणी होत होती. मात्र, गतवर्षीचा अनुभव घेता शंभर टक्के धरण भरल्याखेरीज पाणी कपातीबाबतचा निर्णय न घेण्याची हटवादी भूमिका सुरुवातीच्या काळात महापौर राहुल जाधव यांनी घेतली. त्यावरुन टीकेची झोड उठली होती. अखेर 8 ऑगस्टपासून शहरवासियांना दररोज पाणी पुरवठा करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर म्हणजेच तब्बल पाच महिन्यांनी पिंपरी-चिंचवडकरांची पाणी कपात रद्द झाली. दररोजच्या पाणी पुरवठ्याच्या नागरिकांच्या आनंदावर पहिल्या दिवसापासूनच विरजण पडले. संपूर्ण शहरातून पाणी टंचाईची ओरड सुरू झाली आहे.

याबाबत बोलताना महापौर जाधव म्हणाले की, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असताना महापालिका दिवसाला 450 एमएलडी पाणी उचलत होती. हा पुरवठा निम्म्या शहराला होत होता. त्यामुळे दिवसाआड परंतु, पुरेसे पाणी शहरवासियांना मिळत होते. आता दररोज पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर 475 एमएलडी पाणी उचलले जात आहे. केवळ 25 एमएलडी जास्त पाणी उचलले जात आहे. हा पुरवठा संपूर्ण शहराला करावा लागत आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने विस्कळीत, अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर दररोज किमान 80 ते 90 तक्रारी प्राप्त होत आहेत. चिखली, चिंचवडगाव, काळेवाडी, बिजलीनगर, मासुळकर कॉलनी, मोरवाडी या भागातील तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. दिवसाआड पाणी पुरवठाच योग्य होता. त्यामुळे दररोज पाणी पुरवठ्याचा निर्णय आपण सावधपणे घेत होतो. मात्र, वाढत्या मागणीमुळे घेतलेला हा निर्णय अंगलट आला आहे. दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

पाणी नेमके मुरतेय कुठे?
पाणीपुरवठा पूर्ववत केल्यानंतर 475 एमएलडी पाणी उचलले जात आहे. असे असतानाही तक्रारींमध्ये वाढ झाली. समान पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्काडा प्रणाली बसविली आहे. महापालिका चोविसतास पाणी पुरवठ्याचे नियोजन करीत आहे. शहरातील अनेक भागात जादा क्षमतेच्या जलवाहिन्या टाकून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, असे असतानाही शहरात पाण्याची अभूतपूर्व “बोंब’ सुरू झाली आहे. त्यामुळे पाणी नेमके कुठे मुरतेय?, असा सवाल करदाते करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.