सोलापुर: सोलापुरात करोनाग्रस्त रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आता महापौर व त्यांच्या पतीलाही करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या दोघांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोलापूरमध्ये करोनाबाधित 40 रूग्णांची नव्याने भर पडली असून त्यात महापौर व त्यांच्या पतीचाही समावेश असल्याचे समजताच महापालिका यंत्रणेत खळबळ उडाली. दरम्यान, रेल्वे लाईन्समधील महापौर निवासासह महापौरांचे खासगी निवासस्थान व परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे.
महापौरांना अंगदुखीसह अशक्तपणा जाणवू लागला असता त्यांना तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यांच्या पतीलाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांतील सर्व नऊ सदस्यांची करोनाशी संबंधित चाचणी केली असता महापौर व त्यांच्या पतीशिवाय अन्य सर्वांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.