स्थायी समितीचा निवृत्त सदस्यांचा ठराव तयार होऊन उलटला महिनाफ
नगर – महापालिकेच्या अर्थकारणात स्थायी समितीची भूमिका महत्वाची आहे. लाखोंच्या निविदांना समितीत मंजुरी दिली जाते. त्यामुळे या समितीवर जाण्याचा नगरसेवकांचा प्रयत्न असतो. निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागेवर नव्याने त्याच पक्षातील आठ सदस्य निवडण्यासाठी स्वतंत्र महासभा बोलावण्याचा मानस महापौर बाबासाहेब वाकळे यांचा आहे. मात्र बसपाचे स्थायी समितीचे सभापती मुद्दसर शेख यांनी अद्यापही ठरावावर सही न केल्याने एक प्रकारे निवडीला ब्रेकच लागला आहे. त्यामुळे महापौरांना झाली निवडीची घाई अन सभापती देईनात सही अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या महिन्यात महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सावेडी येथील महात्मा ज्योतीबा फुले प्राथमिक विद्यालयातील राजश्री रमेश सोनवणे व प्रतिक्षा अनिल भालेराव यांच्या हस्ते निवृत्त सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या निवृत्त सदस्यांमध्ये संध्या पवार (कॉंग्रेस), विद्या खैरे, ज्ञानेश्वर येवले, गणेश कवडे (शिवसेना), दीपाली बारस्कर, अविनाश घुले, शोभा बोरकर (राष्ट्रवादी), मनोज कोतकर (भाजप) यांचा समावेश आहे.
निवृत्त सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्य निवडण्यासाठी आयुक्तांच्या स्वाक्षरीने महासभेकडे प्रस्ताव पाठवला जातो. यानंतर उर्वरित आठ सदस्यांच्या निवडी होते. या निवडीसाठी निवृत्त झालेल्या सदस्यांच्या पक्षांचा गटनेता आपल्या पक्षांतील सदस्यांच्या नावाची शिफारस करतात. यानंतर त्यावर महासभेत मंजूरी देवून निवड केली जाते. मात्र प्रभाग क्रमांक सहा अ मधील शिवसेनेच्या नगरसेवीका भुतकर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने व पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव या निवडून आल्याने भाजपचे संख्याबळ वाढणार आहे.
त्यामुळे स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य कमी होवून भाजपच्या एक सदस्यात वाढ होणार आहे. त्यामुळे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जोर धरला असून स्थायी सदस्यांची लवकरात लवकर निवड करण्यासाठी महासभा बोलवाणार आहेत. मात्र निवृत्त सदस्यांचाच ठरावावर सभापती मुद्दसर शेख यांनी अद्यापही सही न केल्याने या निवडीला एक प्रकारे ब्रेकच लागला आहे.
तसेच मनपा सत्तेत भाजपला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात बसपला दोन वर्षे स्थायी समिती सभापतीपद देण्याचा निर्णय झालेला होता. पहिले एक वर्षे मुदस्सर शेख व नंतरची एक वर्षे अश्विनी जाधव या सभापती असा फॉर्म्युला बसपअंतर्गत ठरलेला आहे. मुदस्सर शेख हे विद्यमान सभापतीपदी आहेत. वर्षभराचा कार्यकाल पूर्ण झाल्याने 31 रोजी सभेत आठ सदस्य निवृत्त झाले.