आंधळं दळतयं, कुत्र पीठ खातं असल्याची खंत
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनात समन्वय नसल्याची कबुलीच दस्तुरखुद्द महापौर राहुल जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पालिका प्रशासनाचा कारभार म्हणजे आंधळ दळतयं, कुत्र पीठ खातय या म्हणीप्रमाणे झाला असल्याचा टोलाही लगावत याबाबत त्यांनी खंतही
व्यक्त केली.
महापालिकेच्या क्रीडांगणाचा वापर जनावराचा गोठा म्हणून सुरू असल्याचे वृत्त दैनिक “प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली व सबंधित क्रीडांगणाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. दरम्यान त्यांनी शहरातील महापालिकेच्या मिळकती, भूमी जिंदगी विभागामध्ये सुरू असलेला गोंधळ, नगररचना, स्थापत्य आणि भूसंपादन तसेच पाणीपुरवठा विभागाबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, शहरातील मिळकतींची योग्य माहितीच पदाधिकाऱ्यांना मिळत नाही.
योग्य उत्तरे मिळत नसून कोणत्याही विभागाचा एकमेकांशी समन्वय राहिलेला नाही. शहरातील मिळकतींचा लवकरच सर्व्हे केला जाणार असून विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी बैठक बोलाविली जाणार आहे. मात्र सध्याचा कारभार म्हणजे “आंधळ दळतयं, कुत्र पीठ खातयं’ या म्हणीप्रमाणे सुरू आहे.