“करोना’च्या काळातही अवैध धंदे : पोलिसांचा करंटेपणा उघड
पिंपरी – ‘करोना’च्या काळातही शहरात मटका जोमात सुरु आहे. पोलिसांना सोडून इतर सर्वांना दिसत असलेले हे बेकायदेशीर धंदे आता महापौर आणि मनपा आयुक्तांनाही दिसून आला. लाखो रूपयांची उलाढाल करून अनेकांचे संसार उद्धवस्त करणारा “मटका’ बिनधास्तपणे सुरु असल्याचे आज सांगवी भागात महापालिका आयुक्त आणि महापौरांना मान्सूनपूर्व पूर नियंत्रण प्रभाग पाहणी दौरा करत असताना दिसून आले.
गुरुवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे समवेत महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, “ड’ प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका शारदा सोनवणे तसेच संबधित अधिकारी यांनी सांगवी भागातील नदीलगतच्या भागात मान्सूनपूर्व पूर नियंत्रण कामाची पाहणी केली.
दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता तिथे मटक्याचा अड्डा जोमात सुरु असल्याचे दिसले. मटक्याच्या चिठ्ठ्या, रोख रक्कम व तत्सम साहित्य त्याच ठिकाणी टाकून मटका खेळणारे पसार झाले. तसेच त्या ठिकाणी विविध मटका बाजाराचे बोर्ड व त्यावर ओपन क्लोज नंबर आढळून आले.
पिंपरी चिंचवड शहरातील अशा प्रकारचे मटक्याचे धंदे अनेक ठिकाणी सुरु असण्याची शक्यता आहे. पोलीस यंत्रणेने या अवैध मटका धंद्याकडे वेळीच लक्ष घालून ते तातडीने बंद करावे.
– नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेते