कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नसले, तरी या चर्चेत कॉंग्रेसच्या पदरात पडलेल्या 51 जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात पुण्यातून कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांत उमेदवारी जाहीर करण्यात शहरात कॉंग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. तर, भाजपकडून सोमवारी सुनील कांबळे यांचे नाव फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघातून “एमआयएम’कडूनही माजी नगरसेविका हिना मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कॉंग्रेसकडून सलग चौथ्यांदा बागवे यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असले, तरी अद्याप पुण्यातील आघाडीचे जागावाटप अंतिम न झाल्याने आघाडीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या याद्या जाहीर केलेल्या नाहीत. आठ जागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस-4 आणि कॉंग्रेस 3 जागा लढविणार असून 1 जागा मित्र पक्ष लढविणार आहे. पण, हा मित्रपक्ष कोण आणि त्याचा मतदारसंघ कोणता, याबद्दल सस्पेन्स कायम आहे. मात्र, त्यानंतरही केवळ कॉंग्रेसने शहरातील आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. त्यात शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट या अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघातून माजी मंत्री आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. याठिकाणी कॉंग्रेसकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टीही इच्छुक होते.
तर, भाजपकडून विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे या नाव अंतिम झाले आहे. महायुतीच्या जागावाटपात रिपाइंने (आठवले गट) मतदारसंघाची मागणी केली होती. पण, आता भाजपची यादी निश्चित झाल्यानंतर येथील लढत निश्चित झाली आहे.