रस्त्यावरील आठवडे बाजार बंद करणार

महापालिकेचा निर्णय; अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून कारवाई

पुणे – महापालिकेच्या मिळकतींमध्ये अथवा रस्त्यावर विनापरवाना भरवण्यात येणारे आठवडे बाजारांवर महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत आठवडे बाजार भरवण्यात येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

शहरात राज्य कृषी महामंडळाच्या परवानगीने आठवडे बाजार भरवण्यात येतो. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता यावा हा यामागचा मूळ उद्देश्‍य आहे. मात्र, यालाच हरताळ फासण्यात आला असून, अनेक माननीयांकडून महापालिकेच्या जागेत आठवडेबाजार भरवण्याला प्रोत्साहन देण्यात येते. एवढेच नव्हे तर यासाठी महापालिकेची मोकळी मैदाने, शाळांचे मैदान याचाही वापर करण्यात येतो. मात्र, याठिकाणचा शेतीमाल हा थेट शेतकरी घेऊन येत नाहीत तर तो मार्केट यार्डमधून येथील व्यापारीच घेऊन येतात आणि विकतात, ही वस्तुस्थिती आहे.

महापालिकेच्या मिळकती आणि रस्त्यांवर सुरू असलेले आठवडे बाजार अनधिकृत असून त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नसल्याचे राज्य कृषी मंडळाकडून नुकतेच लेखी महापालिकेला कळवण्यात आले आहे. त्यामुळे या बाजारांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे असेही या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. शहरामध्ये रस्त्यावर आणि महापालिकेच्या जागेत भरवण्यात येणाऱ्या अनधिकृत आठवडे बाजारामुळे वाहतूक कोंडी होते.

साफसफाई न करणे, बाजार संपल्यानंतर कचरा न उचलणे, अस्वच्छता पसरवणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, अशा तक्रारी महापालिका प्रशासनाला मिळाल्या आहेत. त्यामुळे आता रितसर परवानगी घेऊन आणि योग्यप्रकारे नियोजन असणारे आठवडे बाजार भरवण्याबाबात महापालिका प्रशासनाकडून नियोजन करण्यात येणार आहे. अनधिकृत बाजारांवर येत्या सात दिवसात कारवाई सुरू करण्यात येणार आहे. असे प्रकटन प्रसिद्धीमाध्यमात देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.