लाखणगाव, (वार्ताहर) – पावसामुळे अनेक झेंडूचे बाग खराब झाले. त्यामुळे झेंडू उत्पादन घटले. सध्या गणेश उत्सव सुरू झाल्याने झेंडू फुलांचे बाजारभाव कडाडले आहे.
सध्या प्रति किलो १३० ते १४० रुपये बाजारभाव मिळत असल्याने झेंडू उत्पादक शेतकरी समाधानी असून एका कॅरेटला १३०० ते १४०० रुपये मिळत आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होताना दिसत आहे.
गणेश उत्सव सुरू झाला असून गणपती उत्सवात झेंडूच्या फुलांना चांगली मागणी वाढली आहे. यावर्षी उत्सवात झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असून झेंडू फुलाला १३० ते १४० रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे.
त्यामुळे १० किलोच्या एका कॅरेटला १३०० ते १४०० रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. बाजारभाव वाढल्याने झेंडू उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी झेंडूचे प्रती किलो दर ८० ते ९० रुपये होते. त्यावेळेस झेंडू विक्री फारशी परवडत नव्हती. परंतु गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर झेंडूच्या फुलांना मागणी वाढली.
त्यामुळे शेतकऱ्यांना झेंडू फुलांपासून चांगला फायदा होत आहे. काठापूर बुद्रुक येथील शेतकरी योगेश करंडे यांनी ५२ गुंठे शेतात झेंडूचे पीक घेतले आहे. झेंडू लागवड केल्यापासून त्यांना अजून पर्यंत ८० हजार रुपये भांडवली खर्च आला आहे.
सहा ते सात तोडे अजूनपर्यंत झेंडूचे झाले असून अजूनही आठ ते नऊ तोडे होण्याची आशा आहे. झेंडू लागवडीनंतर मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस, वातावरणातील बदल यामुळे मोठ्या प्रमाणात झेंडूवर रोगराई आली. फुलांवर याचा परिणाम झाला.
बाजारभाव कमी असल्याने सुरुवातीला झेंडू परवडत नव्हता. तरीही शेतकरी योगेश खंडू करंडे यांनी झेंडू बागेची चांगल्या प्रकारे जोपासना केली.
सध्या झेंडूला चांगला बाजारभाव मिळत आहे. आता एका तोड्याला ७० ते ८० कॅरेट झेंडू फुले निघत आहे. एका तोड्याचे ८० ते ९० हजार रुपये संबंधित शेतकऱ्याला मिळत आहे. त्यामुळे झेंडुपासून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.
कोट : १२ ते १३ दिवसांपूर्वी २५ ते ३० रुपये प्रति किलो असा झेंडूला बाजारभाव होता. गणेश उत्सव सुरू झाल्यानंतर हा बाजारभाव ८० ते ९० रुपये किलो झाला.
सोमवार, दि.९ पासून झेंडूचा बाजारभाव १२० ते १३० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे सध्या झेंडूपासून चांगला आर्थिक फायदा होत आहे. -योगेश खंडु करंडे, काठापूर बुद्रुक शेतकरी.