बाजारपेठ 2 महिन्यांनंतर खुली

गर्दीवर बाऊन्सरचा वॉच; हातगाडी, फेरीवाल्यांना मनाई

नगर  (प्रतिनिधी) – व्यावसायिकांच्या मागणीनंतर नगर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला कापडबाजार, नवीपेठ आज तब्बल 67 दिवसांनंतर खुली झाली. बुधवारी बाजारपेठाचा सुटीचा दिवस असतांनाही कापडबाजार, नवीपेठमधील सर्वच दुकाने उघडली होती. कापडबाजारात गर्दी होऊ नये, म्हणून खास खासगी चार बाऊन्सरची नियुक्‍ती करण्यात आली होती. कापडबाजार खुला झाल्यानंतरही ग्राहकांची फारशी वर्दळ दिसली नाही. करोनाच्या सर्व नियमांचे पालन करून दुकानदारांनी व्यवसायाला सुरवात केली. हातगाडी व फेरीवाल्यांना मात्र मनाई करण्यात आली होती. कापडबाजार सुरू झाल्याने शहराच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे.

महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी मंगळवारी कापडबाजार, नवीपेठ खुली करण्याचे आदेश काढले. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकाने उघडी राहणार असल्याचे स्पष्ट केले बाजारपेठ 2 महिन्यांनंतर खुली होते. त्यानुसार आज सकाळी महापालिकेच्या पथकाने कापडबाजारात पाहणी केल्यानंतर दुकाने उघडण्यास सुरूवात झाली.

कापडबाजार, भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक, नवीपेठ श्रीराम कॉम्प्लेक्‍स ते नेता सुभाष चौक, शहाजी रोड, कापडबाजार ते नवीपेठ दरम्यानची दुकाने आज उघडण्यात आली. चितळे रस्ता, तेलीखुंट चौक ते चौपाटी कारंजा, लक्ष्मीकारंजा, जुना कापडबाजार, माणिकचौक- भिंगारवाला चौक येथील दुकाने गुरुवारी, तर सारडा गल्ली, मोची गल्ली, गंजबाजारातील दुकाने शुक्रवारी उघडणार आहेत. त्यानुसार आज चितळे रस्त्यावरील दुकाने बंद होती.

काहींनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी ही दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. नगर शहरातील मुख्य बाजारपेठ बंद असल्याने येथील व्यावसायिकांनी ही दुकाने खुली करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेतली. व्यापारी व आ. जगताप यांच्या समवेत आयुक्‍तांनी बैठक घेवून कापडबाजार खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज 67 दिवसांनी कापडबाजारामधील दुकाने उघडली.

व्यापाऱ्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्काचा वापर करून करोना प्रतिबंध उपायययोजनांचे पालन करीत दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सेवा दिली. त्यामुळे दुकानात मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. दुकानात आलेल्या ग्राहकांना सॅनिटायझर करण्यात येत होते.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार आहेत. त्याचे हातावर पोट आहे. त्यामुळे ही बाजारपेठ सुरू करून पूर्वपदावर येणे आवश्‍यक असल्याने महापालिका प्रशासनाला बाजारपेठ सुरू करण्याची मागणी केली. प्रशासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आज बाजारपेठ सुरू झाली आहे. तरी दुकानदारांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक ती काळजी द्यावी.
संग्राम जगताप ,आमदार

बाजारपेठातील दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी झाल्यास, नियम न पाळल्यास तसेच मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आल्यास दुकाने सील करण्यात येतील.
श्रीकांत मायकलवार , आयुक्‍त महापालिका

Leave A Reply

Your email address will not be published.