हापूसच्या नावाखाली “कर्नाटक’चा बाजार

आडत्यांची झडती : तिघांकडून 399 खोकी आंबा जप्त

पुणे  -हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री सुरू असल्याचे समोर आल्यानंतर बाजार समिती प्रशासनाने आंबा बाजारात तपासणी मोहीम सुरू केली आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात तीन आडत्यांकडून आंब्यांचे 399 खोकी जप्त करण्यात आली. या आडत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

फळबाजारात करण्यात आलेल्या कारवाईत नॅशनल फ्रूट कंपनी या गाळ्यावरून दोन डझनाचे 177 खोकी, एक डझनाचे 77 खोकी, रुकमुद्दीन शेख यांच्या गाळ्यावरून दोन डझनाचे 53 तसेच आबासाहेब जगताप यांच्या गाळ्यावरून दोन डझनाची 82 खोकी जप्त करण्यात आली. रत्नागिरी आणि देवगड हापूस असे लिहिलेल्या खोक्‍यांमध्ये कर्नाटक आंब्यांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

आडत्यांकडून 11 हजार 800 रुपयांची पावती करण्यात आली आहे, तसेच 35 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली आंब्यांच्या खोक्‍यांची बाजार समितीने लिलाव पद्धतीने विक्री केली. त्यासाठी पाच खरेदीदारांना बोली लावली होती. एका खरेदीदारांनी 80 हजार 950 रुपयांची बोली लावली होती. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनाखाली फळबाजार विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी ही कारवाई केली.

आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी यापुढील काळात कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. कारवाई केलेल्या आडत्यांनी पुन्हा असे प्रकार केल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
– मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.