- दसऱ्यानिमित्त खरेदीला उठाव
पिंपरी – दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी चांगलाच भाव खाल्ला आहे. झेंडू प्रति किलो दीडशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. केवळ तीन दिवसांपूर्वी 20 रुपये आणि मागील पंधरवड्यात शेतकऱ्यांना अवघ्या दहा रुपये किलो दराने झेंडू विकावा लागला होता. परंतु दसरा येताच किरकोळ बाजारात झेडूंने थेट दीडशे रुपयांपर्यंत मजल मारली. पिंपरी बाजारपेठेत आज कमी आवक झाली. तुलनेत मागणी मात्र चांगली राहिली.
दसऱ्याच्या दिवशी पुजेसाठी झेंडूची फुले लागतात. फुलांचे हार बनवून त्याचा दसऱ्याच्या दिवशी पुजेसाठी तसेच वाहनांना हार घालण्यासाठी झेंडूची आवर्जून खरेदी केली जाते. झेंडूची फुले 60 रुपये किलो या दराने विकली जात होती. मात्र, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांनी चांगलाच भाव खाल्ला आहे. केशरी आणि पिवळा झेंडू 150 ते 200 रुपये किलो या दराने विकला जात आहे. पावसामुळे झेंडूची फुले भिजली आहेत. त्यामुळे यंदा झेंडूच्या फुलांची पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथून कमी आवक झाली. दसऱ्यानिमित्त लागणारी खास आपट्याची पाने 10 ते 20 रुपये या दराने विकली जात आहेत.
खरेदीसाठी उत्साह
करोना प्रादुर्भावाची भीती असली तरीही मास्क घालून नागरिकांनी आज दसऱ्यानिमित्त पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची आवर्जून खरेदी केली. त्यासाठी पिंपरी, चिंचवड व शहरातील अन्य बाजारपेठांमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये नागरिक आता घराबाहेर पडून उत्सवाचा आनंद घेत असल्याचे चित्र पाहण्यास मिळू लागले आहे.
फुलांचे दर (प्रति किलो) –
कलकत्ता झेंडू : 150 ते 200 रुपये, शेवंती : 400 रुपये, ऍस्टर – 300 ते 450 रुपये, पिवळी शेवंती – 400 रुपये, निशिगंध – 500 ते 700 रुपये.