पिंपरी – गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे दोन सण सलग आल्याने पिंपरी येथील फुलबाजारात सोमवारी (दि. 12) झेंडू शंभर रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे. फुलबाजारात फुलांची आवक चांगली झाली असली तर झेंडूचे दर चढे राहिले आहेत.
पिंपरी येथील बाजारपेठेत गुलटेकडी मार्केट, डुडुळगाव, चऱ्होली, साळुंब्रे, मावळ, पाटस, दौंड येथून फुलांची आवक होते. शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊनमुळे झेंडू शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला. त्यामुळे बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची चांगलीच आवक झाली. त्यामुळे झेंडूचे दर स्थिर राहणे अपेक्षित होते. तथापि, मंगळवारी (दि. 13) गुढीपाडवा आणि बुधवारी (दि. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे दोन सण सलग आल्याने झेंडूचे दर चढे राहिले. पिंपरी बाजारपेठेत आज केशरी आणि पिवळा झेंडू 100 रुपये किलो या दराने विकला जात होता. त्याचे दर 20 ते 40 रुपये किलोपर्यंत असतात. मात्र, त्यामध्ये दुपटीहून आधिक वाढ झाली आहे.
गुलछडीच्या दरातही भरीव वाढ
गुलछडी 70 ते 120 रुपये किलो या दराने विकली जातात. त्याच्या दरामध्ये 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुलछडी सध्या 160 ते 200 रुपये किलो या दराने विकले जात आहे. बिजली – 50 ते 80 रुपये किलो, ऍस्टर – 120 ते 150 रुपये किलो, सुट्टा गुलाब – 160 ते 200 रुपये किलो.