मुंबई – 28 मे रोजी दिल्ली येथे एकीकडे नवीन संसद इमारतीचे उदघाटन अगदी शाही पद्धतीने पार पडले. तर दुसरीकडे जंतर मंतर मैदानावर कुस्तीपटूंच्या खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला एक हिंसक वळण मिळाल्याचे दिसून आले. रविवारी ‘महिला महापंचायत’ भरविण्यासाठी कुस्तीपटुंनी नवीन संसद भवनाकडे आगेकूच केली होती.
परंतु दिल्ली पोलीसांकडून त्यांना रोखण्यात आले असून आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर घडलेल्या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका देखील केली.
दरम्यान, यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिलं असून आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालवलं अशी मागणी केली आहे. राज ठाकरेंनी हे पत्र आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील शेअर केलं आहे. राज ठाकरे म्हणतात… “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे
कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना 28 मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती…’ असं ते म्हणाले आहेत.
राज ठाकरेंचं पत्र….
आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.
ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे.
अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे… ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील 26/11 च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत.
ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.
म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल?
आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची 28 मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे. आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती. आपला,
– राज ठाकरे