बिबट्याच्या धास्तीने मांडवे परिसर भयभीत

संगमनेर  (शहर प्रतिनिधी)- तालुक्‍यातील मांडवे बुद्रुक गावच्या परिसरात साधारण दोन बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थ सध्या भीतीचे छायेत वावरत आहेत. मागील काही महिन्यांपासून बिबट्यांचा संचार साकूर परिसरात वाढत चालला आहे. तसेच बिबट्यांचे जनावरांवर थेट हल्ले देखील सुरू आहेत. मांडवे बुद्रुक शिवारात तरंगे वस्तीवरील सखाराम खंडू सोडणर यांच्या तीन शेळ्या, कोंडीभाऊ चोरामले यांची दोन दिवसांपूर्वी एक मेंढी, तर भाऊसाहेब म्हतू तरंगे यांच्या गायीवर पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला होता. मारुती गेनू चोरामले यांच्या घरातच घुसून काही महिन्यांपूर्वी बिबट्याने हल्ला केल्याची घटनाही घडल्याचे रूपेश धूळगंड यांनी सांगितले. तरंगेवस्तीवर बिबट्याने नुकताच शेळ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

साकूर परिसरात अंदाजे 3 ते 4 बिबटे असल्याने बिबट्यांनी जंगल सोडून गावांकडे मोर्चा वळवला आहे. बिबटे थेटपणाने संचार करत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे, तर अनेकजण प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याचे सांगत आहेत. याअगोदर हिवरगाव पठार, बिरेवाडी, कौठेमलकापूर, मांडवे बुद्रुक आदी गावांमध्ये बिबट्यांनी हल्ले चढवत कालवडी, गायी, कोंबड्या, मेंढ्या, कुत्री, शेळ्यांचा फडशा पाडल्याच्या घटनाही घडल्या आहे.

साकूर परिसरातीलच एका व्यक्तिवर देखील बिबट्याने हल्ला केला होता. अनेक वेळा ग्रामस्थांनी बिबट्यांना धाडसाने पिटाळूनही लावले आहे. बिबट्यांच्या दहशतीने ग्रामस्थांना रात्री अपरात्री घराबाहेर पडणेही मुश्‍किल बनले आहे. रात्रीच्या वेळी फटाके फोडून ग्रामस्थांनी अनेकवेळा बिबट्यांना पिटाळून लावून रात्र जागून काढली आहे. साकूर परिसर मोठा असल्याने बिबट्यांचा वावर अधिक आहे. मात्र एवढ्या घटना घडूनही वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात येत आहे.

परिसरातील वनविभागाचे कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी करतात तरी काय, असा थेट सवाल ग्रामस्थ विचारत आहे. एखादा मानवी जीव गेल्यावरच लक्ष देणार का? हाच प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याचे एवढे हल्ले होऊनही योग्य त्या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावला नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तरी लवकरात लवकर वनविभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी ताईबाई धूळगंड, रूपेश धूळगंड, भाऊसाहेब डोलनर, मन्सूर सय्यद, म्हाळू धूळगंड, आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here