आपल्या जीवाभावाचा माणूस…

कणखर नेतृत्व, प्रशासनावर उत्तम पकड, प्रबळ इच्छाशक्‍ती, अडचणीच्या काळात खंबीर साथ देणारे, महाराष्ट्रातील प्रश्‍नांची जाण असणारे, मनमोकळेपणा, धाडसी निर्णय, परखड वक्‍ता असे व्यक्‍तिमत्त्व असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नाव घेताच “आपल्या जिवाभावाचा माणूस’ असे प्रत्येकाच्या मनाला वाटते. त्यामुळेच दादा रागविले तरीही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाराज होत नाही.’ कारण, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांविषयी असलेली त्यांची तळमळ आणि सुख-दु:खात धावून जाणारा नेता अशी प्रतिमा कार्यकर्त्यांमध्ये आहे. आदरणीय दादांनी यापुढेही असेच समाजकारण-राजकारणासाठी भरपूर वेळ द्यावा. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असून, ती लवकर पूर्ण होवो. त्यांना चांगले आरोग्य लाभावे अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना.

आद्य शंकराचार्य, कवी मोरोपंत आणि आता पवार कुटुंबीयांच्या पावन बारामती भूमीमध्ये आमच्या सारख्यांचा जन्म झाला, हे आम्ही आमचे भाग्यच. महाविद्यालयीन जीवनामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचा एक वेगळा पगडा आमच्या मनावर होता. त्यामुळे विद्यार्थीदशेमध्ये नेतेगिरी करावी असे वाटत होते. यावेळी अजितदादा पवार हे राजकारणामध्ये येऊ पाहात होते. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात 1981 मध्ये टी.सी. महाविद्यालयातून झाली. आपले एक स्वतंत्र अस्तित्व असावे, समाजाने आपल्याला वेगळ्या भूमिकेतून पहावे असे वाटत होते. त्यावेळीही आदरणीय पवार साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर होता. मात्र, पवार कुटुंबीयांच्या विरोधातली नेतेमंडळी आमच्यासारख्याला उचलून धरत होती. त्यावेळी राजकीय परिपक्वता नसल्यामुळे आम्हीही हुरळून जायचो.

सन 1992 ते 2002 बारामती नगरच्या नगरसेवक, 1997 ला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, 2002 ते 2007 ला जिल्हा परिषद सदस्य, 2007 ते 2016 पीडीसी बॅंकेचे संचालक, 2007 ला दूध संघावर संचालक आणि परत 2012 ते 2017 या कालावधीमध्ये पुन्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. त्यावेळी विरोधात असतानाही राजकारणात आपण कुणीतरी असावे, अशी उर्मी दादांमुळेच होती. आमच्या वडिलांच्या अमृतमहोत्सवी समारंभानिमित्त आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि दादा आवर्जुन उपस्थित होते. त्यावेळी मी वैचारिकदृष्ट्या विरोधात असूनही त्याचा किंचितही स्पर्श पवार कुटुंबीयांच्या मनाला न झाल्याचे जाणवले. त्यांची कामाची पद्धत, दिलेला शब्द पाळणे यामुळे यापुढील राजकीय कारकीर्द पवार कुटुंबीयांबरोबर पार पाडायची असे ठरविले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

2017 पूर्वी मी अध्यक्षपदी विराजमान होण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु दादांनी मला शब्द दिला होता, “योग्य वेळ आल्यावर तुला संधी देणार.’ तो शब्द त्यांनी आज पूर्ण केला आहे. त्यावेळी माझ्या प्रचारात दादा स्वत: उतरले. बऱ्याच लोकांना मी निवडून येईल असे वाटत नव्हते. परंतु दादांनी मतदारसंघ पिंजून काढला आणि निवडून आणले. दादांनी अध्यक्षपदाच्या अडीच वर्षांच्या कालावधीत मोलाचे मार्गदर्शन केले. सध्या राज्यात आणि केंद्रात विरोधकांचे सरकार आहे. परंतु दादांच्या पाठिंब्यामुळे तसेच आदरणीय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामुळे कोणत्याही अडचणी येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रत्येक कामामध्ये रोल मॉडेल ठरत आहे.

दादांमुळे प्रशासकीय कामकाज कसे करावे, कामे मार्गी कशी लावावी, कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे, सार्वजनिक हिताच्या विरोधात जाऊन काही कामे केली तर त्याचे परिणाम काय होतील याची माहिती मिळते. पवार कुटुंबीयांनी बारामतीसारख्या बहुतांश जिरायती असणाऱ्या भागांमध्ये औद्योगिक वसाहतींची जोड दिली. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाले आणि कुटुंबांना खऱ्या अर्थाने आधार मिळाला. अशीच अवस्था पिंपरी-चिंचवड, भोसरी, हिंजवडी, हडपसर या भागांमध्ये होती. परंतु, पवारांच्या नेतृत्वामुळे या भागांत औद्योगीत वसाहत उभी राहिली, परिसराचा झपाट्याने विकास झाला. आदरणीय पवार साहेब आणि दादा यांनी दूरदृष्टी ठेवून हा विकास केला नसता तर आजची परिस्थिती काय असते याचे चिंतन सर्वांनी करणे गरजेचे वाटते.


– विश्‍वासराव देवकाते (अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)