नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय योगदिनाचा मुख्य कार्यक्रम यावेळी झारखंडची राजधानी रांची येथे होणार असून 21 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. आयुष मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभात तारा मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात तीस हजार नागरीक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाविषयी जागृती करण्यासाठी त्या राज्यात 13 जून रोजीही एका भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यालाही देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संपुर्ण जगात सन 2015 सालापासून योग दिन आयोजित केला जातो. दिल्लीतील मुख्य कार्यक्रम राजपथावर होणार असून आयुष मंत्रालयाच्या मदतीने नवी दिल्ली महापालिका या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांनी अन्य विभागांच्या मदतीने ठिकठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करून देशात योग जागृती वाढवावी अशी सूचनाहीं आयुष मंत्रालयाने केली आहे. देशातील विविध राज्यांच्यावतीनेही हे कार्यक्रम आयोजित केले असून त्यासाठी केंद्रीय पातळीवर एक समान योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 45 मिनीटांच्या या कार्यक्रमात विविध आसने केली जाणार आहेत.