दहशत मोडून काढण्याचा प्रमुख अजेंडा 

नरेंद्र पाटील : सातारा तालुक्‍यातील विविध गावांमध्ये प्रचार

कराड – गेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील उद्योग बाहेरील जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत होत आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती ओस पडू लागल्या आहेत. केवळ हप्तेखोरी आणि गुंडगिरीमुळेच हे सर्व घडत असून ही दहशत मोडून काढण्याचा आपला प्रमुख अजेंडा असल्याची माहिती सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी सातारा तालुक्‍यातील विविध गावांच्या प्रचारदौऱ्यात दिली.

याप्रसंगी कार्यकर्ते आणि मतदारांना संबोधित करताना नरेंद्र पाटील म्हणाले, गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील उद्योग मोडून कंपन्या बाहेर का निघून जात आहेत. याचा मतदारांनी शोध घ्यावा. याच्या मुळाशी असणारे दुसरे तिसरे काही कारण नसून राजकीय आश्रयावर चालणारी हप्तेखोरी आणि गुंडगिरीच आहे. या गुंडगिरीला आळा घालून बाहेरील जिल्ह्यात स्थलांतरीत झालेले उद्योग पुन्हा जिल्ह्यात आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. सातारा जिल्हा दहशतवाद मुक्त करुन गेली दहा वर्षे रखडलेला विकास आपणास पुन्हा मार्गी लावायचा आहे. जिल्ह्यातील उद्योग बंद पडल्यामुळे पोटापाण्यासाठी मुंबई-पुण्याला धावणारा बेरोजगारांचा लोंढा थोपवून येथेच त्यांच्या हाताला शाश्‍वत काम देण्यासाठी पुढच्या काळात आम्ही नियोजनबध्द पाऊले उचलणार आहोत.

माझ्याकडे जिल्ह्याच्या विकासाचा नेमका प्लॅन तयार आहे. दहा वर्षातील विकासाचा प्रलंबीत बॅकलॉग भरुन काढून विकासातील एक आदर्श जिल्हा म्हणून देशात साताऱ्याची मान अभिमानाने ताठ करण्यासाठी मी रात्रीचा दिवस करणार आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीची सत्ता पुन्हा राज्यासह देशात प्रस्थापित होत असताना सातारा जिल्ह्यातील जनतेने पाठीमागे न रहाता विकासाच्या नव्या वेगवान प्रवाहात ताकदीने सामील व्हावे. शेतीपूरक व्यवसाय, लहान-मोठे उद्योग, सिंचनाच्या शाश्‍वत सुविधा, दर्जेदार शिक्षण व आरोग्य सुविधांव्दारे आपल्याला जिल्ह्याचा सामाजिक व आर्थिक विकास साधायचा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.