पालघर – पालघर जिल्ह्यात 76 हजार कोटींची गुंतवणूक असणारे वाढवण बंदराचे काम सुरू झाले आहे. तसेच सी लिंकचा विस्तार पालघर डहाणूपर्यंत करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. विशेष म्हणजे वाढवण बंदराबरोबरच या ठिकाणी सरकारने विमानतळ करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीचे सरकार राज्यात विकासाची गंगा घेवून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
पालघरचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, पालघरचा विकास हाच ध्यास घेऊन सरकार काम करत आहे. या राज्यात विकासाचे विकेंद्रीकरण करणार असून राज्यात कुठूनही पोहोचण्यासाठी सहा तांसावर वेळ लागणार नाही, असा ॲक्सिस कंट्रोल ग्रीड तयार केला जात आहे.
वर्सोवा ते विरार, विरार ते पालघर आणि पालघर ते डहाणू हा एक्सप्रेस सी लिंक तयार होणार आहे. त्यामुळे इथल्या जनतेला कमी वेळात मुंबईत पोहोचता येईल. त्याशिवाय ‘एमएमआरडीए’चा पालघरपर्यंत विस्तार केला आहे. पालघरमध्ये नवीन विमानतळ उभारतोय. मोठ्या प्रकल्पांमुळे पालघर एक ग्रोथ सेंटर होईल, असा माहिती त्यांनी दिली.
राज्यात केंद्र आणि राज्य मिळून डबल इंजिन सरकार काम करत आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारने लोक कल्याणच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे. आता मतदान झाले की, लगेच डिसेंबरचे पैसे देणार आहे. लाडक्या बहिणीला केवळ 1500 रुपये देऊन थांबवणार नाही तर त्यात आणखी वाढ करू. मात्र अडीच वर्षात महाविकास आघाडीने जनतेला काही दिले नाही, असा टोला त्यांनी लगाविला.