महाविकास आघाडी चांगल्या यंत्रणा निर्माण करेल

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विश्‍वास : केंद्र सरकारवरही टीका

पुणे – “अवघ्या दहा रुपयात थाळी, ही संकल्पना नुकतीच रुजू झाली आहे. त्याचा महिलांना उद्योगक्षेत्र म्हणून कसा उपयोग करून घेता येईल, हे पाहायला हवे. या योजनेला केंद्र सरकारचा निधी आहे. केंद्र सरकारची अवस्था बोलाची कढी बोलाचा भात याप्रमाणे आहे. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही चांगल्या यंत्रणा उभ्या करू,’ असे सांगत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहांतर्गत पर्व स्त्री शक्तीचे – महिला स्वयंरोगजार, मार्केटिंग व व्यक्‍तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी कमल व्यवहारे, ऍड.कमल सावंत, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, व्याख्याते दत्ता कोहिनकर, निवेदिता बडदे, वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, नगरसेविका लता राजगुरू, वैशाली मराठे, डॉ.विकास आबनावे, सचिन तावरे, इंदिरा अहिरे, शिवानी माने, कार्यक्रमाच्या निमंत्रक प्राची दुधाने, अर्चना शहा, दुर्गा शुक्रे, पल्लवी सुरसे, वैशाली तावरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात “पर्व स्त्री शक्ती पुरस्कार’देखील प्रदान करण्यात आले. हैद्राबाद येथील घटनेचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत पीडित महिलेला आदरांजली वाहण्यात आली.

विद्याधर अनास्कर म्हणाले, “बचत गटांच्या माध्यमातून महिला स्वयंरोजगाराकडे वळतात. पैशांची बचत करून कुटुंबाला आधार देण्याकरीता पुढे येतात. त्यामुळे बॅंकेच्या माध्यमातून पैशाची बचत व वृद्धी करण्याचा प्रयत्न महिलांनी करायला हवा.’ मोहन जोशी यांचेही यावेळी भाषण झाले. योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन, अर्चना शहा यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.