महाविकास आघाडीने जनतेच मरण स्वस्त केलं

करोनाबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचा राज्य सरकारवर घणाघात

केंदूर (पुणे) – करोना महामारीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गोर गरीब जनतेच्या आरोग्याची जबाबदारी झटकली आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं मरण स्वस्त केलं. अशा भावना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी व्यक्‍त केल्या. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमात बोलत होते.

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून शिक्रापूर येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे, रोहित खैरे, बाबासाहेब दरेकर यांनी आरोग्य शिबीर आणि औषधी वनस्पतींचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

राज्यातील बारा लाख करोनाबाधित रुग्णांपैकी फक्‍त 9 हजार लोकांनाच सरकारच्या योजनेचा लाभ मिळाला. मुख्यमंत्री घरातच क्वारंटाइन आहेत. ते मातोश्री सोडत नाहीत. उपमुख्यमंत्री फक्‍त पुणे आणि बारामतीमध्ये फिरत आहेत. राज्यातील इतर मंत्रीदेखील फिरत नाहीत. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, असेही भेगडे म्हणाले.

सरकारने आपलं गाव आपली जबाबदारीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. राज्य सरकारची जबाबदारी नाही का? करोना महासंकटात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे गेले? भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गणेश दगडे यांनी 50 बेडचे कोविड सेंटर उभे केले. भाजपचे कार्यकर्ते कोविड सेंटर उभे करत आहेत. चारा छावण्या उभ्या करायच्या असत्या तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि साखर कारखानदार सर्वात पुढे असते. अशी उपरोधिक टीका भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी केली. कंगनाचे घर एका रात्रीत पडते मात्र बोगस बि- बियाणे विक्रेत्यांवर कारवाई होत नाही, असेही फराटे म्हणाले.

राज्याचे आरोग्यमंत्री रस्त्याने जाता-जाता शिरूर तालुक्‍याचा आढावा घेऊन गेले. त्यावेळी आरोग्य मंत्र्यांच्या लक्षात आले शिरूर तालुक्‍यात महात्मा फुले जन आरोग्य योजनाच कार्यान्वित नाही, रुग्णांना बेड उपलब्ध नाही, हॉस्पिटल मिळत नाही, व्हेंटिलेटर नाही अशा वेळी तालुक्‍याचे कार्यक्षम म्हणवून घेणारे तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी काय करतात? असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी उपस्थित केला. यावेळी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 300 रुग्णांची आरोग्य तपासणी करून नेत्र चिकित्सा, गरजूंना चष्मे, औषधे व 700 औषधी वनस्पतींचे वाटप यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, गणेश दगडे, यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी धर्मेंद्र खंडारे, सुदर्शन चौधरी, अमोल शिवले, प्रवीण काळभोर, संजय पाचंगे, पंडित भुजबळ, राजाभाऊ तांबे, बाळासाहेब चव्हाण, गणेश कुटे, संदीप सातव, शाम गावडे, राजेंद्र ढमढेरे, काकासाहेब खळदकर, संतोष करपे, रवींद्र कंद उपस्थित होते. नितीन गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. जयेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. रोहीत बाळासाहेब खैरे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.