सुशिक्षितांचा वेडेपणा…; करोना लपविण्याची मनोवृत्ती

गृह निर्माण सोसायट्यांमध्ये वाढते बाधित

– हर्षद कटारिया 

बिबवेवाडी – झोपडपट्टी वसाहतीत करोनाबाधितांची संख्या वाढू लागली होती. मार्केट यार्ड, बिबवेवाडी ओटा, अप्पर इंदिरा नगर येथे महानगरपालिकेच्या प्रयत्नातून वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करोनाने गृह निर्माण सोसायट्यांमध्ये शिरकाव केला आहे. करोनाची लागण झाल्यानंतर लोक काय म्हणतील… आपल्याला सहकार्य करणार नाहीत, अशा कारणांतून आजार लपविला जात आहे. यातूनच बाधितांची संख्या वाढत आहे. 

लॉकडाऊन काळातही सर्व नियमांची पायमल्ली करीत काही उचभ्रू सोसायट्यांमध्ये टेरेसवर पार्ट्या रंगत होत्या. आता, तर लॉकडाऊन शिथिल झाल्याने अशा पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. यातून बाधितांची संख्या वाढत आहे.

सोसायटीमधील इतर सभासद चुकीची वागणूक देतील, आपले नाव खराब होईल, अशा विचारातून सुशिक्षित लोक करोना आजार लपविण्यात धन्यता मानत आहेत. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यापेक्षा घरातच उपचार घेण्यावर युवकांचा अधिक भर आहे. करोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांना घरात उपचारांची परवानगी दिली जात असली तरी असे रुग्ण घराबाहेर पडत असल्याने सोसायट्यांमध्ये रुग्णसंख्या वाढून इतरांचे जीव धोक्‍यात येत आहेत, अशा अनेक घटनांमधून काही ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग होऊन गंभीर घटना घडल्या आहेत. आजार लपवून ठेवण्याच्या वृत्तीमुळे आजार बळावत इतरांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. 

घरकाम करणाऱ्यांपासूनही माहिती लपवतात…
करोना पॉझिटिव्ह असलेल्यांकडून घरकामासाठी येणाऱ्या महिलांना याबाबतची कल्पना दिली जात नाही. घरकाम करणाऱ्या महिला अनेक घरात घरकामासाठी जात असल्याने यातूनही करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्यांचा जीवही धोक्‍यात येत आहे.

सौम्य लक्षणे असलेल्या करोना रुग्णाला घरातच होम आयसोलट केल्यानंतर योग्य दक्षता घेण्यासाठी सोसायटीमधील इतर सभासदांनाही याबाबतची कल्पना दिली जाते. घरात होम आयसोलेट केल्यानंतर संबंधित रुग्णांसोबत असलेल्या व्यक्तीला सुरक्षेबाबत माहिती देऊन हमीपत्र घेतले जाते. होम आयसोलेट असताना रुग्ण नियम तोडत सोसायटीमध्ये इतरांना संसर्ग होईल, असे कृत्य करत असेल तर महानगरपालिकेच्या हेल्पलाइन नंबर 9689939552 वर तातडीने माहिती द्यावी. 

– डॉ. रुपाली बुधकर, वैद्यकीय अधिकारी, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

Leave A Reply

Your email address will not be published.